Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण आज आला. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे. अयोध्येतील राम मंदिर सुंदर फुलांनी सजलं आहे.


राम मंदिराच्या अभिषेकासंदर्भात लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. आता राम मंदिरात (Ram Mandir) मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवसच का निवडण्यात आला आणि आजच्या मुहूर्ताबद्दल इतकं खास काय होतं? सगळं सविस्तर जाणून घेऊया.


अवघ्या 84 सेकंदांचा शुभ मूहूर्त


अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामल्लांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी अवघ्या 84 सेकंदांचा शुभ मूहूर्त होता. हा शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटं 8 सेकंदांना सुरू होऊन तो दुपारी 12 वाजून 30 मिनिटं 31 सेकंदांनी संपला. या शुभ मुहूर्तावर रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आता रामलला अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले आहेत. शेकडो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार देखील झाले.


राम मंदिरासाठी 22 जानेवारीचीच निवड का?


हिंदू कॅलेंडरनुसार, 22 जानेवारी ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग सकाळी 8:47 वाजेपर्यंत होता, त्यानंतर इंद्र योग सुरू झाला. ज्योतिष्यांच्या मते, 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण केल्याचं सांगितलं जातं. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार आहेत, म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि हा दिवस राम मंदिराच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आला आहे.


22 जानेवारीला अनेक शुभ योग


ज्योतिषांच्या मते, 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार झाले आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग तयार होत आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या योगांमध्ये कोणतेही काम केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या कामात यश मिळतं. सूर्यदेव देखील मकर राशीत विराजमान असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. 


म्हणून झाली 22 जानेवारीची निवड


धार्मिक मान्यतेनुसार, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाच्या संयोगादरम्यान झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून आले आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारीची निवड करण्यात आली.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ramlala Pran Pratishtha at home : आज घरीच रामललाची पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य