Ramlala Pran Pratishtha At Home : जगभरातील हिंदूचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांची आज, म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. बालस्वरूप असलेल्या रामलालाच्या मूर्तीची अभिषेकासह प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशासाठी आजचा दिवस उत्सव पर्व आहे. प्रत्येक रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. 22 जानेवारी 2024 हा रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. ज्या दिवसाची सर्व राम भक्त वर्षानुवर्षे वाट पाहत होते, तो दिवस अखेर आला आहे.
काही जण या सोहळ्यासाठी अयोध्येत गेले आहेच. तर काही जण घरुनच ऑनलाईन हा सोहळा बघणार आहे. तर काही जण या दिवशी आपल्या घरात प्रभू श्रीरामाची मूर्ती (Ram) स्थापन करणार आहे. जर तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नसाल, तर रामललाच्या अभिषेक दिनी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही घरी कोणत्या पद्धतीने त्यांची पूजा करू शकता? जाणून घ्या.
पूजेसाठी घरी आणा या वस्तू
सर्वप्रथम घरी रामललाची मूर्ती किंवा फोटो आणा. पूजेचं ताट तयार करा. त्यात अक्षता, हळद, कुंकू, चंदन, फुलं, हार, अगरबत्ती, साजूक तूप किंवा तेलाचा दिवा, फळं आणि प्रसादासाठी मिठाई ठेवा. आरतीसाठी कापूर आणि फुलं, दिवा, घंटा आदी गोष्टी तयार ठेवा.
अशी करा पूजेची तयारी
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी तुम्ही तुमच्या घरातील मंदिराची साफसफाई करा. तुमच्या घरातील देव्हाऱ्याची देखील साफसफाई करा, त्यात कोणताही फाटलेला जुना फोटो किंवा इतर खराब झालेलं साहित्य राहणार नाही, याची काळजी घ्या. अंघोळ करुन देव्हाऱ्यातील देवांनाही स्वच्छ करा. चांगले कपडे परिधान करुन पूजेला सुरुवात करा.
अशा प्रकारे करा पूजा सुफळ-संपन्न
प्रथम रामाच्या मूर्तीला जलाभिषेक करुन पंचामृताने न्हाऊ घाला. मूर्तीला फुलं अर्पण करा. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुल, फळं, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. श्रीराम सोबतच हनुमानजींचीही पूजा करायला विसरू नका. यानंतर हनुमान चालीसा, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ नक्की करा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: