Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पितृ पंधरवड्यात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. साधारणतः भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन कृष्ण पक्ष अमावास्येपर्यंत असा 15 ते 16 दिवस पितृपक्ष असतो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध घालतात. श्राद्ध विधींमध्ये पितरांना नैवेद्य, पिंडदान आणि इतर धार्मिक विधी केले जातात. पण, तुम्हाला माहीत असेल की, हिंदू धर्मात पितृ पंधरवड्यात कावळ्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे. तसेच, या प्रथेला खूप महत्त्व आहे. 


पितृपक्षात केलेल्या श्राद्ध विधींचे अन्न कावळ्यांना खाऊ घातल्यास पितरांना मुक्ती आणि शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. यामुळे पितर प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देतात, त्यामुळे साधकाच्या कुंडलीत पितृदोष असल्यास पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पण पितृपक्षात कावळ्यांनाच का नैवेद्य दाखवतात?


पितृ पक्षात कावळ्यांना अन्नदान का करतात? 


यमदूताचं प्रतीक मानले जातात... 


हिंदू धर्मात कावळा हे यमदूताचे वाहन आणि यमाचे प्रतीक मानले जातात. यमराज हा मृत्यूचा देव आहे. असं मानलं जातं की, पितृपक्षात पितरांचे आत्मा पृथ्वीवर येतात आणि कावळ्यांच्या रूपात अन्नाचं सेवन करतात. जेव्हा आपण कावळ्यांना अन्न देतो, तेव्हा असं मानलं जातं की, आपण आपल्या पूर्वजांना संतुष्ट करतो आणि त्यांच्या आत्म्याला संतुष्ट करतो. 


पूर्वजांचा दूत म्हणजे, कावळा


काही मान्यतांनुसार, कावळे देखील पूर्वजांचे दूत मानले जातात. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना खाऊ घातल्यामुळे पितृदोष दूर होतोच, त्यासोबतच पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो.


कावळा आणि भगवान राम यांचा संबंध महत्त्वाचा 


कावळा देखील भगवान रामाशी संबंधित मानला जातो. ज्याचा एका पौराणिक कथेत उल्लेख आहे. कथेनुसार, एकदा एका कावळ्यानं माता सीतेच्या पायावर चोच मारली होती. त्यामुळे माता सीतेच्या पायाला जखम झाली. माता सीतेला वेदना होत असल्याचं पाहून भगवान राम क्रोधित झाले आणि त्यांनी बाण मारून कावळ्याला जखमी केलं. यानंतर जेव्हा कावळ्याला आपली चूक समजली, त्यावेळी त्यानं माता सीता आणि भगवान श्रीराम यांची माफी मागितली. भगवान श्रीरामांनी लगेच कावळ्याला माफ केलं आणि वरदान दिलं की, आता तुझ्याद्वारेच पितरांना मोक्ष मिळेल. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची ही परंपरा शतकानुशतकं सुरू आहे, अशी अख्यायिका सांगितली जाते. 


(टीप : वर सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pitru Paksha: पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या, तर वेळीच सावध व्हा; पितृदोषाचे संकेत तर नाहीत...!