Pandharpur News : पुढील शेकडो वर्षासाठी विठ्ठल-रुक्मिणी आता येत्या दोन दिवसात नवीन मेघडंबरीत विसावणार असून या सागवानी मेघडंबरील चांदी लावण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे . विशेष म्हणजे यासाठी लागणारी जवळपास 230 किलो चांदी नांदेड येथील एका विठ्ठल भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
विठ्ठलभक्ताकडून 2 कोटींहून अधिक रकमेची चांदी दान
नांदेड येथील व्यवसायाने ठेकेदार असणारा हा विठ्ठल भक्त दरवर्षी पायी दिंडीसोबत पंढरपूरला आषाढीसाठी येत असतो. विठ्ठल मंदिरात नवीन मेघडंबरी बनवण्याचे काम सुरु असल्याची बातमी त्याने ABP माझावर पाहिल्यावर त्याने यासाठी लागणारी जवळपास 2 कोटी पेक्षा जास्त रकमेची चांदी अर्पण करण्याची भावना मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे बोलून दाखवली. मंदिर समितीने त्यास होकार देताच त्याने आपले दान गुप्त राहावे, या भावनेतून नाव जाहीर न करण्याची विनंती मंदिर समितीला केली होती. त्यानुसार या अनामिक भाविकाने विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीवर बसवायची सर्व चांदी मंदिराकडे अर्पण केल्यावर आता सागवानी मेघडंबरीवर ही चांदी बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
बारीक नक्षीकाम असणारे सर्व सुटे भाग मंदिरात आणले
हे चांदी बसवण्याचं काम पंढरपूर येथील प्रसिद्ध सोनार अविनाश जव्हेरी यांचेकडे असून त्यांनी हे काम पुणे येथील जांगीड सिल्वर वर्क्स या कंपनीकडून करून घेतलं आहे. पूर्वी या मेघडंबरीसाठी 20 गेजचा चांदीचा पत्रा वापरण्यात येत होता . त्यामुळे त्याची झीजही लवकर होत होती . हे टाळण्यासाठी आता या मेघडंबरील 16 गेजचा जाड चांदीचा पत्रा वापरण्यात आला आहे . या मेघडंबरीवर पूर्वी होते तशीच संपूर्ण नक्षीकाम जांगड कंपनीने हाताने बनवलं असून गेले 15 दिवस कंपनीत या मेघडंबरील लागणारे चांदीची अतिशय बारीक नक्षीकाम असणारे सर्व सुटे भाग मंदिरात आणले गेले आहेत.
शुद्ध चांदीत मढवणार मेघडंबरी
यानंतर मंदिर समितीने या सर्व चांदीच्या भागांचे वजन करून पुन्हा या कंपनीच्या ताब्यात दिले . आता या लाकडी मेघडंबरीवर हे विविध सुटे भाग बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे . या मेघडंबरीसाठी वापरलेली सर्व चांदी ही शुद्ध वापरण्यात आलेली आहे . सध्या विठुरायाच्या मूळ रूपात असलेल्या दगडी गाभाऱ्यात केवळ विठूरायाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दगडी सिहासनावरील मातेची मूर्ती दिसत होती . मात्र येत्या दोन ते तीन दिवसात आता विठुराया आणि रुक्मिणीमाता पुढील शेकडो वर्षासाठी या नवीन मेघडंबरीत विसावणार आहेत.
हेही वाचा: