Numerology Number 1: ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला (Numerology) विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे 0 ते 9 मूलांकावर आधारित असते. प्रत्येक मुलांकाची स्वतःची एक ओळख असते. त्याप्रमाणे, मूलांक 1 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळे असते. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 1 असतो.
मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे, जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो. मूलांक क्रमांक 1 असलेले लोक त्यांच्या दृढनिश्चयी आणि उत्कृष्ट नेतृत्व शैलीच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक नेमके कसे असतात? जाणून घेऊया.
मूलांक 1 चे लोक असतात प्रामाणिक
मूलांक 1 असलेले लोक फार प्रामाणिक असतात. काही प्रमाणात हे लोक हट्टी आणि अहंकारी देखील असतात. 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक स्वाभिमानी, अतिशय महत्त्वाकांक्षी असतात. स्वत:ची कामं करण्यात कुशल आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. या जन्मतारखेचे लोक आकर्षक आणि सुंदर असतात. या लोकांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही.
1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक निडर, धैर्यवान आणि स्वाभिमानी असतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना ते अजिबात घाबरत नाहीत. मात्र, कधी कधी हे लोक स्वार्थीही होतात.
आर्थिक परिस्थिती राहते चांगली
1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेचे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. या जन्मतारखेच्या लोकांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही. हे लोक आपल्या ऐषोआरामावरही भरपूर पैसा खर्च करतात. या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते.
मूलांक 1 च्या लोकांचं मूलांक 2, 3, 9 असलेल्या लोकांशी चांगलं जुळतं. त्यांच्यातील प्रेमाचं नातं कायम राहतं. 1, 10, 19 किंवा 28 जन्मतारखेच्या लोकांना आरोग्याशी संबंधित फारशा समस्या नसतात. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी रविवार आणि सोमवार हे दिवस शुभ आहेत.
मूलांक कसा काढला जातो?
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : 2024 मध्ये शनिची स्थिती 3 वेळा बदलणार; मेषसह 'या' राशींच्या लोकांचं उजळणार नशीब