Navdurga 2024 : नवरात्रौत्सवातील आजचा रंग आहे निळा... निळा रंग असतो आभाळाचा! आपल्या कुटुंबावर प्रेम करणा-या, गृहिणी-रूपी दुर्गेने केलेली माया देखील निळया आभाळासारखीच असते! आणि ही माया उतरते... तिनं आपल्या कुटुंबासाठी, अगदी आत्मीयतेने केलेल्या चविष्ट अशा स्वयंपाकामध्ये... म्हणूनच तिला आपण अन्नपूर्णा म्हणतो! आजची आपली अन्नपूर्णेच्या रूपात असलेली दुर्गा म्हणजे... सुप्रसिध्द पाककला तज्ञ सौ. स्मिता अभिनय देव! 


मूळच्या कारवार प्रांतातील स्मिता... आजीने मांडलेल्या छानशा स्वयंपाकघरामुळे त्यांना अगदी बालपणापासूनच स्वयंपाकाची आवड निर्माण झाली! आई-आजी- मावशी यांना स्वयंपाकात मदत करायला त्यांना खूपच आवडायचं! वयाच्या 12-13 व्या वर्षांपासूनच त्यांनी स्वयंपाक शिकायला अन् प्रत्यक्ष स्वयंपाक करायलाही सुरूवात केली! 


आजोळ जरी कर्नाटकातल्या गावातलं असलं तरी... स्मिता या बांद्रयात राहणा-या, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या. कधीकाळी आपण आयपीएस ऑफिसर बनावं अशी त्यांची इच्छा होती. पण, वडिलांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांनी टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरींगमध्ये डिग्री घेतली आणि त्यानंतर काही दिवसांतच त्यांचं लग्न झालं! मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द, प्रख्यात आणि प्रचंड यशस्वी अशा श्री. रमेश आणि सौ. सीमा देव यांच्या देव घराण्यात धाकटी सून म्हणून स्मिता यांचा प्रवेश झाला, प्रख्यात दिग्दर्शक श्री. अभिनय देव यांची पत्नी म्हणून! 


घरातील सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी ही, त्या घरातील स्वयंपाक करणा-या गृहिणीच्याच हातात असते, हे त्यांनी बरोबर ओळखले होते! सुरूवातीपासून त्यांची अभ्यासू वृत्ती होती... त्यामुळे त्यांनी पाककलेतील शास्त्र हे अगदी सखोलपणे जाणून घेतलं. केवळ पदार्थांच्या चवीचा विचार न करता... त्या त्या वेळचा ऋतू, त्या प्रदेशाची भौगोलिक स्थिती याचाही जास्तीत जास्त विचार अन् अभ्यास त्यांनी केला. त्यामुळे कुठलाही पदार्थ चविष्ट बनवताना त्याची डाएट आणि न्यूट्रिशन लेव्हल सांभाळता येऊ लागली. ताटात वाढल्या जाणा-या पदार्थांमधील विविध पोषक घटक, त्यांचे आहारातील विशिष्ट प्रमाण... याबददल आपल्या अनेक स्टुडन्टसना त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि सध्याही करत आहेत.


पण... एवढयावरच न थांबता पाककलेवरील एका पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे... या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद लाभला असून, दुसरी आवृत्ती लवकरच येत आहे! त्यांचे स्वतःचे एक यूटयूब चॅनेलही आहे, जे प्रचंड लोकप्रिय आहे! आपण आपलं काम मन लावून केलं... तर ती एक पूजा असते आणि स्वयंपाकघर हे एक मंदिरच असते. या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून आजवर अनेक अन्नपूर्णा घडवणा-या या आधुनिक अन्नपूर्णेला, या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने, आम्ही आदरपूर्वक नमन करतो!    


पाहा व्हिडीओ : 



हे ही वाचा : 


Navdurga 2024 : किरण बेदींना डोळ्यासमोर ठेऊन चंग गाठला; पुढे तडफदार नेतृत्व बनल्या - IPS शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांचा अनोखा प्रवास