Makar Sankranti Surya Dev, Shani Dev Puja Vidhi : आज 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti 2023) आहे. नववर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्रांतीचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. याल मकर संक्रांत, लोहरी आणि पोंगल अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवसाला सुगीचा सण, सूर्यपूजा, उत्तरायण, ऋतू बदल असंही म्हणतात. मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. कारण या दिवशी सूर्याची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. 


मकर संक्रांत नववर्षातील पहिला सण


सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. पंचांगानुसार, या वर्षी 2023 मध्ये, सूर्याने 14 जानेवारीच्या रात्री मकर राशीत प्रवेश केला, त्यामुळे तिथीनुसार मकर संक्रांती दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची कृपा आणि आशीर्वाद मिळावा यासाठी पूजा करण्याची प्रथा आहे. सूर्यदेवाच्या पूजेचा विधी जाणून घ्या.


Makar Sankranti 2023 Surya Dev Puja Importance : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व


मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची पूजा आणि उपासने करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने जीवनात नवीन ऊर्जा, तेज आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. प्रचलित पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव पुत्र शनिदेवाला भेटायला जातात, असे मानले जाते. जेव्हा सूर्यदेव पहिल्यांदा शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा शनिदेवाने सूर्यदेवाचे काळ्या तीळाने स्वागत केले. यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले, अशी कथा प्रचलित आहे.


Makar Sankranti 2023 Surya Dev Puja Vidhi : सूर्यदेव पूजा विधी



  • पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात. म्हणूनच विशेष फल प्राप्तीसाठी या दिवशी सूर्यदेव आणि शनिदेव यांची पूजा करावी. काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करून शनिदेवाची पूजा करा.

  • सूर्यदेवाला विधीनुसार अर्घ्य देऊन पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्री गणेश आणि भगवान श्रीकृष्ण यांचीही पूजा केली जाते. यांना तीळ, पाणी आणि फुले अर्पण करून पूजा करावी.

  • मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर चौरंग किंवा पाटावर पिवळे कापड पसरून त्यावर सूर्यदेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापन करा.

  • सूर्यदेवाला हळद आणि चंदनाचा टिळा करून अक्षता अर्पण करा. आता लाल फुले अर्पण करा. धूप अगरबत्ती आणि दिवा लावा. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तीळ, गूळ आणि खिचडीही अर्पण केली जाते. पूजेच्या शेवटी आरती करून देवासमोर हात जोडून नैवेद्य दाखवा.


मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचा मंत्र



  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः 

  • ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ ।

  • ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य: 

  • ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घ्य दिवाकर:।

  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)