Mahashivratri 2024 : नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि यासोबतच आता हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांनाही सुरुवात होईल. जानेवारीत मकर संक्रांत संपली की मार्चमध्ये महाशिवरात्री येईल. महाशिवरात्री (Mahashivratri) ही देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. या दिवशी महादेवाची आराधना केली जाते.
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. दरवर्षी भोलेनाथाचे भक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्री हा शिवपूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. हा शिव आणि शक्तीच्या भेटीचा दिवस आहे. यंदाच्या वर्षात (New Year 2024) महाशिवरात्री कधी आहे, याची तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
2024 मध्ये महाशिवरात्री कधी? (Mahashivratri 2024 Date)
यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे . या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जागर ठेवून शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार, महाशिवरात्रीचा उत्सव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. उत्तर भारतीय दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.
महाशिवरात्री 2024 मुहूर्त (Mahashivratri 2024 Muhurta)
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी 8 मार्चला रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. शिवरात्रीला रात्री पूजा केली जात असल्याने त्यात उदयतिथी पाहण्याची गरज नाही.
महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते. मात्र, प्रदोष आणि निशित काळतील पूजेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, 9 मार्चला मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिट ते 12 वाजून 56 मिनिटांपर्यंत निशिता पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
निशिता काळ मुहूर्त - 12.07AM ते 12.55AM (9 मार्च 2024)
व्रत पारण मुहूर्त - सकाळी 06.37 ते दुपारी 03.28 (9 मार्च 2024)
महाशिवरात्री का साजरी केली जाते? (Mahashivratri Significance)
महाशिवरात्री हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे खास आहे. या तिथीला महादेवाने संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केल्याचं सांगितलं जातं. या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला. दुसर्या मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले. शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रुपात प्रकट झाले. महाशिवरात्रीच्या दिवशीच 64 वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन झालं. या दिवशी शिवाची पूजा केल्याने सर्व संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Makar Sankranti 2024 : यंदा मकर संक्रांत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व