Maha Kumbh 2025: हिंदू धर्मानुसार, 2025 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण याच वर्षी महाकुंभाचे आयोजन केले जात आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महाकुंभाला विशेष महत्त्व आहे. 2025 मध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळा सुरू होणार असून तो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महाकुंभात त्रिवेणीच्या तीरावर म्हणजेच गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर स्नान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महाकुंभात गंगा स्नान केल्याने अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते. महाकुंभ मेळा विशेष योग आणि ग्रहाच्या स्थितीनुसार भरतो. असे म्हणतात कुंभात स्नान केल्याने तुमचा आध्यात्मिक विकास होण्यास मदत होते आणि तुमची पापेही धुतली जातात. मात्र, फार कमी लोकांना माहीत असेल की, चंद्र देवाच्या एका चुकीमुळे आज पृथ्वीवर कुंभमेळा भरतो. दुसऱ्या शब्दांत, चंद्र देवाची चूक पृथ्वीवरील लोकांसाठी वरदान ठरली. चंद्राशी संबंधित महाकुंभाची ही रंजक कहाणी येथे जाणून घेऊया.
समुद्रमंथन - अमृत कलशासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध
पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. समुद्रमंथनादरम्यान समुद्रातून अनेक मौल्यवान वस्तू बाहेर आल्या. यापैकी एक होता अमृत कलश. अमृत पात्रासाठी देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. राक्षसांनी देवांचा पराभव करून अमृताचे भांडे आपल्याजवळ ठेवले होते. तेव्हा देवांनी इंद्राचा मुलगा जयंत याला अमृत पात्र आणायला पाठवले. जयंतने पक्ष्याचे रूप धारण करून कपटाने राक्षसांकडून अमृताचे भांडे चोरले होते.
अमृत कलश घ्यायला जाताना प्रत्येक देवाला जबाबदारी..
धार्मिक मान्यतेनुसारस जयंत जेव्हा दानवांपासून अमृत कलश घ्यायला गेला तेव्हा सूर्य, चंद्र, गुरू आणि शनिही जयंतसोबत गेले. प्रत्येक देवाला जबाबदारी दिली होती.
- सूर्याला अमृताचे भांडे तुटण्यापासून वाचवायचे होते.
- अमृताचे भांडे चुकूनही सांडणार नाही याची जबाबदारी चंद्रावर देण्यात आली होती.
- देव गुरु बृहस्पती यांना राक्षसांना रोखण्यासाठी पाठवले होते.
- जयंत स्वतः सर्व अमृत पिऊ नये, म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शनिदेवाला देण्यात आली होती.
चंद्राने केली 'ही' चूक
धार्मिक मान्यतेनुसार, देव जेव्हा अमृताचे भांडे स्वर्गात आणत होते तेव्हा चंद्राकडून चूक झाली होती. अमृताचे भांडे सांडणार नाही याची जबाबदारी चंद्रावर देण्यात आली होती, पण एका छोट्याशा चुकीमुळे अमृताचे चार थेंब भांड्यातून बाहेर गेले. हे चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले: ते ठिकाण म्हणजे, प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यावर ही चार ठिकाणं पवित्र झाली. तेव्हापासून येथे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाऊ लागले.
अनेक जन्मांची पापेही धुतली जातात..
धार्मिक मान्यतेनुसार, अमृत कलश आणण्याची जबाबदारी सूर्य, चंद्र, गुरु आणि शनि यांच्यावर देण्यात आली होती. त्यामुळे आजही या ग्रहांची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभाचे आयोजन केले जाते. महाकुंभात स्नान करणाऱ्या व्यक्तीची अनेक जन्मांची पापेही धुऊन जातात. तसेच कुंभात स्नान केल्याने तुमची आध्यात्मिक प्रगती होते.
हेही वाचा>>>
Maha Kumbh 2025: ऐकलंत का? कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवाच, काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )