नाशिक : आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. जो पर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत गोदावरीत स्नानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तर गोदावरी संवर्धनासाठी मास्टर प्लन केला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
नाशिमध्ये दर बारा वर्षानी भरणारा कुंभमेळा 2027 ला भरणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच नियोजनाला सुरुवात झाली आहे. आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग आपत्ती व्यवस्थापन आशा वेगवेगळ्या विभागाकडून प्रस्ताव सादर केले जात असतानाच गोदावरी संवर्धनाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. ज्या गोदावरीच्या सान्निध्यात कुंभमेळा भरतो, त्या गोदावरीची प्रदूषणापासून मुक्तता जो पर्यंत होत नाही, तोपर्यंत गोदावरी नदीत स्नानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
मागील कुंभमेळा काळात देखील गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता, त्यावेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गोदावरीचे पाणी मानवी आरोग्यास हानिकारक असल्यानं स्नानासाठी बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि सूचनांचे पालन अद्यापही केले नसल्याची खंत पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहेत.
गोदावरी नदी पात्रात आजही गटार,नाल्याचे पाणी सोडले जाते, जागोजागी पानवेलीचे साम्राज्य वाढले आहे, नदीच्या प्रदुषित पाण्यात भाविक श्रद्धेनं डुबकी मारत असून महानगरपालिका सर्रासपणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळेच आता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कमांड हाती घेतली असून कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. केवळ नाशिक महापालिका हद्दीतच नाही, तर त्र्यंबकेश्वर पासूनच गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आणि नदी पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी प्लॅन तयार केला जात आहे, त्या बरोबरच गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, सुशोभिकरण, गोदावरी स्वच्छता अशी कामे हाती घेण्यात येणार आहे.
गोदावरी प्रदूषणाबरोबरच साधूग्रामच्या जागेचा प्रश्न निकाली लावणे, नाशिक त्रंबकेश्वरसह शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे, आरोग्य सेवा सुदृढ करणे, आपत्ती व्यवस्थापनाची टीम उभी करणे असा आव्हानांचा आणि कामाचा डोंगर प्रशासनासमोर उभा आहे, त्यामुळे नव्याने सत्तेत आलेलं राज्यातील महायुती सरकार कुंभमेळाचे कसे नियोजन करणार कोणत्या कामांना प्राध्यान देणार, याकडे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा: