Kojagiri Purnima 2023: आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा (Sharad Pournima) किंवा कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Pournima) म्हणून ओळखलं जातं.  याला रास पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असंही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र (Moon) पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो अधिक तेजोमय आणि आकाराने मोठा दिसतो. यंदा ही पौर्णिमा 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. परंतु, या दिवशी वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण देखील असणार आहे.


यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी?


पंचांगानुसार, या वर्षी आश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबरला, म्हणजेच शनिवारी पहाटे 04:17 वाजता सुरू होत आहे. हा पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 01:53 वाजता संपेल. उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ दोन्ही 28 ऑक्टोबरला येत आहेत, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबरलाच साजरी केली जाईल.


कोजागिरी पौर्णिमेला उकळलेलं दूध पिणं अधिक महत्त्वाचं का?


असं म्हटलं जातं की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध  तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर (Kheer) ठेवून तिचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असं मानलं जातं.


कोजागिरी पौर्णिमा 2023 चंद्रोदयाची वेळ


शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 05 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे.


कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा मुहूर्त


शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी रात्रीचे तीन शुभ मुहूर्त आहेत. शुभ-उत्तम मुहूर्त रात्री 08:52 ते 10:29 पर्यंत आहे, अमृत-सर्वोत्तम मुहूर्त रात्री 10:29 पासून ते 12:05 पर्यंत आहे आणि चार-समन्वय मुहूर्त 12:05 ते 01:41 पर्यंत आहे. रात्रीच्या या तीन मुहूर्तांमध्ये तुम्ही कधीही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता.


कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत


पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. घरातील देव्हारा किंवा मंदिर (Temple) स्वच्छ करुन लक्ष्मी देवी आणि विष्णू देवाच्या पूजेची तयारी करावी. पाटावर लाल कापड पसरवून ठेवावं, त्यावर लक्ष्मी देवी आणि विष्णू देवाची मूर्ती ठेवावी. देवासमोर तूपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षता, कुंकवाचा टिळा लावावा. फुलं, गुलाब आणि मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवावा. नैवेद्यासाठी दुधाची खीर देखील तुम्ही बनवू शकता.


हेही वाचा:


Weekly Panchang 2023: दसरा ते कोजागिरी पौर्णिमा पर्यंत सात दिवसांचे मुहूर्त, राहुकाळ, आठवड्याचे पंचांग जाणून घ्या