Manoj Jarange Patil PC on Hunger Strike : मराठा समाजाचे नेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसतोय. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेट संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.


सरकार दिशाभूल करतंय : जरांगे


अन्न-पाणी घेणार नाही, औषधं घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असं आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केलं आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.


आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात


आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की 14 सप्टेंबर तारखेला मुख्यमंत्री यांनी 1 महिन्याचा वेळ मागितला आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला होता,म्हणून उपोषण सोडलं होतं. आज साखळी उपोषणाचे आज पुन्हा आमरण उपोषणात रूपांतर करत आहे. आता या उपोषणात पाणी आणि औषध उपचार घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.


मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद



'आम्ही 40 दिवस दिले होते'


सरकार आणि मुख्यमंत्री यांचा आणि सर्व पक्षांचा सन्मान घेऊन, त्यांनी (पक्षांनी) सर्वांनी मिळून ठराव घेऊन, आम्ही 40 दिवस दिले मात्र, कोणाकडूनच आजवर आरक्षण देण्यात आलं नाही. सरकारकडून कालपर्यत आशा होती, मात्र, सरकारकडून आणि सर्वच पक्षांकडून झाले नाही, त्यामुळे आज आमरण उपोषण सुरू केलं आहे.


'सरकार समाजाची जाणूनबुजून दिशाभूल करतंय'


जरांगे यांनी सरकारल प्रश्न विचारत आरोपही केले आहेत. सर्व गुन्हे दोन दिवसात मागे घेऊ असे म्हटले होते, पण ते झाले नाही, त्यामुळे सरकार समाजाची जाणूनबुजून दिशाभूल करतंय, असे दिसत आहे. संभाजीनगर वगळता कोणत्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारने मदत केलेली नाही, आंदोलनात अपघातग्रस्त जखमी लोकांना आणखी मदत नाही. 14 तारखेच्या सभेच्या दिवशी काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.