Kamakhya Temple Facts : कामाख्या देवीचं (Kamakhya Devi Facts) मंदिर हे देशभरात प्रसिद्ध आहे. आसामच्या गुवाहाटीत वसलेलं हे मंदिर 108 शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या मंदिरामागे अनेक रहस्यं दडलेली आहेत. या मंदिराची वेगळी गोष्ट म्हणजे या मंदिरात देवीची मूर्ती नाही. या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते. आजही देवीला मासिक पाळी येते आणि या काळात मंदिर बंद ठेवलं जातं. मंदिराशी संबंधित या आणि अशा अनेक रंजक गोष्टी आज आपण जाणून घेऊया.


प्रमुख 18 महाशक्तीपीठांपैकी एक


कामाख्या मंदिर हे 8 व्या शतकात उगम पावलेल्या सर्व 108 शक्तीपीठांपैकी एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा समावेश 18 महाशक्तीपीठांमध्ये होतो. 16 व्या शतकात कूचबिहारचा राजा नर-नारायण यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. तेव्हापासून अनेकवेळा मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं आहे.


...म्हणून मंदिरात होते देवीच्या योनीची पूजा


धर्म पुराणानुसार, भगवान विष्णूने आपल्या चक्राने माता सतीचे 51 भाग केले होते. हे भाग जिथे पडले तिथे तिथे मातेचं शक्तीपीठ तयार झालं. या ठिकाणी मातेची योनी पडली होती, त्यामुळे तिथे देवीची मूर्ती नसून तिच्या योनीची पूजा केली जाते. आज ही जागा एक शक्तीपीठ आहे. दुर्गा पूजा, वसंत पूजा आणि देवीच्या अनेक सणांदरम्यान मंदिराची शोभा पाहण्यासारखी असते.


मंदिर 3 दिवस बंद का ठेवतात?


22 जून ते 25 जूनपर्यंत कामाख्या देवीचं मंदिर बंद असतं, असं म्हणतात. या दिवसांत देवी सतीला मासिक पाळी येते, असं मानलं जातं. या तीन दिवसात पुरुषांनाही मंदिरात प्रवेश करता येणार नाही. या 3 दिवसात देवीच्या दरबारात पांढरं वस्त्र ठेवलं जातं, जे 3 दिवसात लाल होतं. या कापडाला 'अंबुवाची' कापड म्हणतात.


मासिक पाळीचं कापड घेण्यासाठी होते गर्दी


अनेकजण देवीचं मासिक पाळीचं कापड घरी घेऊन जातात.  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण अनेक भाविक देवीच्या मासिक पाळीच्या रक्तात भिजलेला कापूस घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे असतात.


ब्रह्मपुत्रा नदी देखील होते लाल


जून महिन्यात कामाख्याजवळून जाणारी ब्रह्मपुत्रा नदी देखील लाल होते. नदी लाल होण्याचं कारण म्हणजे, या काळात देवीला मासिक पाळी येत असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या चार गाभाऱ्यांपैकी 'गर्वर्गिहा' हे सतीचे गर्भ असल्याचं सांगितलं जातं.


वर्षातील सर्वात मोठी जत्रा


दरवर्षी कामाख्याला मोठी जत्रा भरते, ज्याला 'अंबुवाची' जत्रा म्हणतात. ही जत्रा जूनमध्ये भरते. ही जत्रा देवीला मासिक पाळी येते त्या काळात भरते. या काळात कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मासिक पाळीच्या काळात तीन दिवस मंदिर बंद राहिल्यानंतर, चौथ्या दिवशी मंदिर पुन्हा उत्सव साजरा करुन उघडलं जातं.


तीन वेळा दर्शन घेणं महत्त्वाचं


जे लोक या मंदिराचं तीन वेळा दर्शन घेतात त्यांना सांसारिक बंधनातून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. कामाख्या मंदिर हे तंत्रविद्येसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातील साधू-संतही येथे दर्शनासाठी येतात.


मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी


जेव्हा भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, त्यावेळी मंदिरात कन्या भोजन घालण्याची प्रथा आहे.


येथे काही लोक प्राण्यांचा बळी देतात. पण यातही खास गोष्ट म्हणजे येथे मादी प्राण्यांचा बळी दिला जात नाही.


कामाख्या देवी ही तांत्रिकांची मुख्य देवी आहे. भगवान शंकराची नववधू म्हणून तिची पूजा केली जाते.


येथील तांत्रिक वाईट शक्तींना सहज दूर करू शकतात, त्यांच्याकडे एक चमत्कारिक शक्ती असते, ज्याचा वापर ते अतिशय विचारपूर्वक करतात.


तंत्र-मंत्रासाठी कामाख्या मंदिर प्रचलित आहे. येथे काळी जादू मोठ्या प्रमाणावर केली जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Navpancham Rajyog : राहू आणि मंगळने बनवला शक्तिशाली नवपंचम राजयोग; दिवाळीआधीच 'या' राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ