Kaal Bhairav Jayanti 2024 : सनातन धर्मानुसार, काल भैरवाची (Kaal Bhairav) पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काल भैरव जयंती साजरी केली जाते. काल भैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी भगवान शंकराच्या रौद्र रुपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते.
मान्यतेनुसार, या दिवशी कालभैरवाचं अवतरण झालं होतं. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोक भगवान कालभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख-शांती आणि समृद्धी येते. तसेच, वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे यंदाची कालभैरव जयंती नेमकी कधी असणार आहे. तसेच या जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय असणार आहे ते जाणून घेऊयात.
काल भैरव जयंती कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, यंदाची अष्टमी तिथीची सुरुवात 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी होणार आहे. तर, याचं समापन 23 नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. अशातच 2024 सालची काल भैरव जयंती 22 नोव्हेंबर दिवशी शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे.
काल भैरव जयंतीचा पूजा विधीची शुभ वेळ
22 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत काल भैरवची पूजा करण्याचा शुभ वेळ आहे. जर तुम्ही या दरम्यान पूजा करत असाल तर याचा तुम्हाला विशेष लाभ मिळतो. मान्यतेनुसार, या दरम्यान पूजा केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी राहते.
22 नोव्हेंबर 2024 चा शुभ मुहूर्त
सूर्योदय - सकाळी 6.53
चंद्रोदय - रात्री 11.41
राहू काळ - सकाळी 10.48 पासून दुपारी 12.07 वाजेपर्यंत
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11.46 पासून ते दुपारी 12.28 पर्यंत
अमृत काळ - दुपारी 03.26 पासून ते 05.08 वाजेर्यंत
ब्रह्म मुहूर्त - प्रात:काळ 05.18 पासून ते सकाळी 06.06 वाजेपर्यंत असणार आहे.
काल भैरव पूजा विधी
काल भैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर स्नान करणे. त्याचबरोबर पांढरे कपडे परिधान करावेत आणि उपवास करावा. सर्वात आधी भगवान शंकराची आणि काल भैरवाची पूजा करा. काल भैरवाला काळे तीळ, उडदाची डाळ आणि मोहरीचं तेल अर्पण करा. त्यानंतर मोहरीचा दिवा लावावा. पूजेच्या शेवटी काल भैरवाची आरती करा. पूजेच्या नंतर व्रत पूर्ण झाल्यानंतर श्वानाला 3 ते 5 गोड पौळ्या खाऊ घाला. मान्यतेनुसार, असं केल्याने पूजेचं फळ लवकर मिळतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: