Jaya Ekadashi 2024 : दरवर्षी माघ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशीचं व्रत पाळलं जातं. आज 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचं व्रत आहे. हिंदू धर्मात या एकादशीला खूप महत्त्व आहे. जया एकादशीचं व्रत अत्यंत फलदायी मानलं जातं. जया एकादशीचं (Jaya Ekadashi) व्रत ठेवल्याने सर्व पापांचा होतो, अशी मान्यता आहे.


जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या एकादशीशी संबंधित काही विशेष नियम आहेत. जया एकादशीच्या दिवशी चुकूनही चुकीची कामं करू नये, अन्यथा व्रताचं शुभ फळ मिळत नाही, अशी मान्यता आहे.


जया एकादशीला चुकूनही करू नका 'या' गोष्टी



  • ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होतं. दररोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. मात्र, एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये.

  • या दिवशी तुळशी माताही भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते, असं मानलं जातं, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणंही टाळावं.

  • एकादशीच्या दिवशी चुकूनही भात खाऊ नये. धार्मिक कथांनुसार, जो व्यक्ती एकादशी तिथीला भात खातो तो पुढील जन्मात रांगड्या स्वरूपात जन्म घेतो.

  • एकादशीच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्न आणि मद्याचं सेवन करू नये. 

  • एकादशीचे व्रत सूर्योदयापासून सुरू होऊन द्वादशी तिथीला समाप्त होतं. एकादशीचं व्रत नेहमी शुभ काळातच मोडावं. शुभ मुहूर्तावर पारण केलं नाही तर एकादशीचं व्रत पूर्ण मानलं जात नाही.

  • एकादशीच्या दिवशी दात घासणं देखील चुकीचं मानलं जातं.

  • या दिवशी राग, खोटं बोलणं, चुगली करणं आणि इतरांबद्दल वाईट बोलणं यासारख्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत. असं मानलं जातं की, या दिवशी चांगल्या गोष्टी केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं.


जया एकादशी व्रताचं महत्त्व (Jaya Ekadashi Significance)


हिंदू पुराणात एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितलं होतं. हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. तसेच मानसिक आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी उपवास करणं आवश्यक आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Jaya Ekadashi 2024 : आज जया एकादशी; शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय जाणून घ्या