Holi 2024 : हिंदू धर्मात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे होलिका दहन किंवा होळी पूजन (Holika Dahan) होय. सात रंगांची उधळण करण्याचा, एकमेकांना प्रेमाच्या रंगामध्ये रंगवण्याचा सण होळी... होळी हा असत्यावर सत्याचा विजय याचं प्रतिक म्हणून साजरी केली जाते. होलिका दहनाला यात सर्वात जास्त महत्व आहे. होलिकेचं दहन आदल्या दिवशी रात्री करायचं आणि दुसऱ्यादिवशी मनसोक्त रंगांची उधळण केली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 24 मार्चला होलिका दहन करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा होळी कधी साजरी करावी याबाबत संभ्रम आहे. याचं कारण म्हणजे भद्रा काळ. कोणी म्हणते रात्री 11 नंतर होलिका दहन करावे तर कोणी म्हणते रात्री 9.30 अगोदर सण साजरा करावा अशी चर्चा आहे. मात्र हा संभ्रम पंचागकर्ते मोहन दाते यांनी दूर केला असून रविवारी (24 मार्च) सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे म्हणाले.
फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे 24 मार्चला होलिका दहन करण्यात येणार आहे.हिंदू पंचागानुसार होळीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहे. वृद्धी योग हा रात्री 9.30 पर्यंत आहे. तर ध्रुव योग हा 24 मार्चा पूर्ण दिवस असणार आहे, तर होळी दहनाचा मुहूर्त रात्री 11 वाजून 13 मिनिटे तर रात्री 12 वाजून 07 मिनटापर्यंत असणार आहे. यंदा होळी पूजनावर भद्राचे सावट आहे. भद्रा काळात होलीका दहन करणे शुभ मानले जात नाही. होळीच्या दिवशी भद्रा काळ सकाळी 9 वाजून 54 ते रात्री 11.13 मिनिटापर्यत असणार आहे. भद्रा कालावधीमुळे होळीच्या वेळेबाबत संभ्रम आहे.
काय म्हणाले पंचागकर्ते दाते?
दाते गुरुजी म्हणाले, होळी हा असत्यावर सत्याचा विजय याचं प्रतिक म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण साजरा करण्याच मुख्य हेतू सामाजिक सलोखा जपणे हा आहे. सणाच्या निमित्ताने सर्वांन एकत्र येणे हा आहे. सध्या साजरा करण्यात येणाऱ्या होळीचा हेतू लक्षात घेता आम्ही पंचांगामध्ये देखील होळीसाठी कोणतीही वेळ आणि मर्यादा दिलेली नाही. त्यामुळे सूर्यास्तानंतर रविवारी (24 मार्चला) तुम्ही कधीही होळी साजरी करु शकता. सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी.. पण पुरणाचीच पोळी का? त्यामागे आहे 'हे' पारंपारिक कारण