Hindu Religion: देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवलीय? आधी कोणाची पूजा? मांडणी कशी असावी? धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Hindu Religion: अनेकदा देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवण्याची पद्धत आढळते. दोन्ही देव एकत्र ठेवल्याने काही दोष होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

Hindu Religion: आपल्या घरातील अत्यंत पवित्र ठिकाण ते म्हणजे देवघर... हिंदू संस्कृतीत देवघराला घरातील पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान मानले जाते. देवघर म्हणजे केवळ देवांच्या मूर्ती ठेवण्याची जागा नसून, कुटुंबाच्या श्रद्धा, संस्कार आणि आध्यात्मिक परंपरेचे केंद्र मानले जाते. अनेकदा आपल्या देवघरात विविध प्रकारचे देवी-देवतांच्या मूर्ती, टाक किंवा फोटो असतात. घरातील देवघरात कुलदेवता किंवा कुलदैवताला विशेष महत्त्व दिले जाते. मात्र बऱ्याचदा आपण पाहतो, घरातील देवघरात कुलदेवता आणि भगवान शंकराची पिंड म्हणजेच शिवलिंग एकत्र ठेवण्याची पद्धत अनेक कुटुंबांत आढळते. त्यामुळे दोन्ही देव एकत्र ठेवल्याने काही दोष होतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याबाबत धार्मिक मान्यता काय सांगते? लोकपरंपरा काय? आणि शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या...
देवघरात कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र ठेवले तर...(Hindu Religion)
धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुलदेवता आणि शिवलिंग एकाच देवघरात ठेवणे चुकीचे मानले जात नाही. मात्र देवघरातील मांडणी करताना घरची परंपरा, कुलाचार आणि पूजेची पद्धत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कुलदेवता ही आपल्या कुटुंबाच्या श्रद्धेतील प्रमुख देवता असल्यामुळे देवघरात त्यांना मानाचे आणि स्वच्छ स्थान देण्याची प्रथा आहे. शिवलिंगासाठीही स्वतंत्र आणि स्वच्छ जागा ठेवता येते. दोन्ही एकाच देवघरात असतील तर त्यांच्यामध्ये अनावश्यक वस्तू, सजावटीचे सामान किंवा इतर साहित्य ठेवणे टाळावे.
शिवलिंगासमोर नंदी असेल तर...
धार्मिक मान्यतेनुसार, शिवलिंगासमोर नंदी ठेवण्याची परंपरा असेल तर नंदीची मांडणीही व्यवस्थित करावी. शिवलिंगावर अभिषेक करताना पाणी, बेलपत्र आणि फुले श्रद्धेनुसार अर्पण करता येतात. कुलदेवतेची पूजा मात्र आपल्या घराण्यात चालत आलेल्या पद्धतीनुसार करणे योग्य ठरते.
देवघरात कुलदेवता आणि शंकराची पिंड एकत्र ठेवली असेल तर काय करावे?
- कुलदेवतेला देवघरात मानाचे आणि स्वच्छ स्थान द्यावे, कारण ती कुटुंबाची प्रमुख श्रद्धा असते.
- देवघरात कोणता देव मोठा किंवा लहान असा भेद न करता सर्व देवतांना श्रद्धेने स्थान द्यावे.
- देवघरातील शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र, फुले आणि पाणी श्रद्धेनुसार अर्पण करता येते.
- कुलदेवतेची पूजा घराण्यात चालत आलेल्या परंपरेनुसारच करावी.
- कुलदेवतेचे मूळ टाक गावच्या देवळात असल्यास घरी प्रतिमा किंवा प्रतीक ठेवण्याची परंपरा असू शकते.
- अशा वेळी घरच्या परंपरेनुसार कुलदेवतेचे स्थान निश्चित करून शिवलिंगासोबत ठेवता येते.
सर्व देवतांना श्रद्धेने स्थान द्यावे.....
कुलदेवता आणि शिवलिंग एकत्र असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही.
देवघर स्वच्छ ठेवणे, नियमित पूजा करणे आणि श्रद्धा जपणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
कोणतीही शंका असल्यास घरातील ज्येष्ठ किंवा जाणकार पुरोहितांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा :
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















