Ganeshotsav 2024 : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2024) धामधूम पाहायला मिळतेय. गणेश चतुर्दशीपासून सुरु झालेला हा उत्सव 10 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपतो. या दरम्यान घरी लाडक्या बाप्पाचं आगमन केलं जातं. सुख-समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. एक प्रकारे गणपतीची (Lord Ganesh) सेवा केली जाते. मात्र, जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ येते तेव्हा मात्र, लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाही. अनेकदा लहान मुलांना प्रश्नही पडतो की देवबाप्पा आपल्या घरी येतात मग त्यांचं विसर्जन का करतात? याच संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


गणेश विसर्जनाचं महत्व


यंदा 7 सप्टेंबर रोजी घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन झालं. त्यानुसार 10 दिवसांनी म्हणजेच 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला बुद्धी, वाणीची देवता म्हटलं जातं. यासाठीच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेशापासून केली जाते. त्यानंतर इतर देवी-दैवतांची पूजा केली जाते. गणपतीची पूजा, आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे. त्याचबरोबर श्रीगणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तूदोषही दूर होतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरांत गणपतीची स्थापना केली जाते आणि पुढचे 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे.


गणेश विसर्जनाची पौराणिक कथा 


अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते, कारण असे मानले जाते की गणपती हे जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. ते सतत 10 दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणपतीच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी वेद व्यासजींनी त्यांना पाण्यात विसर्जित केलं, ज्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड, शांत करण्यासाठी केले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; देवी लक्ष्मी 'या' 5 राशींवर होणार प्रसन्न