Actress Pushed by Bouncer In Lalbaghcha Raja : सध्या गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरात सगळीकडे दिसून येत आहे. अनेक सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पााच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईतील 'लालबागच्या राजा'च्या (Lalbaghcha Raja) दर्शनाला मोठी गर्दी होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीला धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.
'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर'ची अभिनेत्री सिमरन बुधरूपला या धक्काबुक्कीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सिमरन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आईदेखील होती. या वेळी मंडपाच्या आवारात असलेल्या बाउंसरने तिच्याशी हुज्जत घालून धक्काबुक्की केली असल्याचे आरोप सिमरनने केला आहे. तिने सोशल मीडियावर याची पोस्ट लिहून माहिती दिली.
आईचा मोबाईल फोन हिसकावला...
सिमरनने या घटनेचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून लालबागचा राजच्या मंडपात असलेल्या बाउंसरने तिच्यासोबत आणि आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओद्वारे सिमरनने संपूर्ण घटना आणि तिच्यासोबत काय घडले हे तपशीलवार सांगितले आहे. सिमरनने म्हटले की, “मी माझ्या आईसोबत लालबागच्या राजाकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, पण तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे आम्हाला वाईट अनुभव आला. माझ्या आईचे फोटो काढत असताना त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने फोन हिसकावून घेतला असल्याचे सिमरने म्हटले. माझी आई माझ्या मागेच दर्शनासाठी रांगेत होती आणि आम्ही कोणताही जास्त वेळ घेत नव्हतो. आईने पुन्हा फोटो खेचण्याच सुरुवात केली तेव्हा त्यांनी पु्न्हा खेचण्याचा प्रयत्न केला.
सिमरने पुढे म्हटले की, या सगळ्या गोंधळात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाउंसरने माझ्या सोबत गैरवर्तवणूक केली. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यास सुरुवात केली तेव्हा माझाही फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांना ज्यावेळी कळले की मी अभिनेत्री आहे, त्यावेळी ते मागे हटले.
भाविकांना होतोय त्रास...
सिमरने पोस्टमध्ये म्हटले की, ही संपूर्ण घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज अधोरेखित करते. सकारात्मकता आणि देवाच्या आशीर्वादाच्या शोधात लोक अशा ठिकाणी चांगल्या मनाने भेट देतात. त्याऐवजी आम्हाला अरेरावी आणि गैरवर्तनाला सामोरे जावे लागते. गर्दी हाताळणे हे एक आव्हानात्मक काम आहे, परंतु अशा प्रकारे भाविकांसोबत गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही तेथील लोकांची जबाबदारी असल्याचे तिने म्हटले.