Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2023) आहे, या दिवशी श्रीगणेशाचा (Lord Ganesha) जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला विनायक चतुर्थी, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने या दिवशी गणपतीला जन्म दिला. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या व्रतामध्ये ही कथा जरूर ऐकावी, तरच उपासनेचे पूर्ण फळ मिळेल.
गणेश जयंती व्रताची कथा
एके दिवशी माता-पार्वती स्नानासाठी जात होती. तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको. माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला. थोड्यावेळाने महादेव तेथे प्रकट झाले, ते आत जाऊ लागले. नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला. महादेव म्हणाले की, " नंदी, तो आदेश इतरांसाठी आहे माझ्यासाठी नाही" यावर स्वामीभक्त नंदीने केवळ मान हलवली, त्यांना नमस्कार करून तो तेथून निघून गेला.
देवी पार्वतीने मळापासून केला गणपती, दिव्य मंत्राने प्राण फुंकले
देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली. तिने महादेवांना विचारले की, " तुम्ही आत येताना नंदीने तुम्हास अडविले नाही का? " यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ आहे. तो केवळ माझ्या आज्ञाचे पालन करतो, महादेवाचे उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली. पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल. तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल. हा विचार अमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली. पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावलेले होते, त्याच्या मळापासून तिने एक मूर्ती तयार केली. त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले. ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली. पार्वती त्या बालकाला न्याहाळतच राहिली. तिने त्यास ' बालगणेश ' अशी हाक मारली. तो 'बालगणेश ' तिला माता म्हणून बिलगला. माता पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. आईच्या गुणांप्रमाणेच बालगणेश तेजस्वी आणि बुद्धिवान होता.
बालगणेशाने आपल्या मातेस तसे वचन दिले..
एके दिवशी स्नानास जाताना पार्वतीने त्यास असे सांगितले की, "आजपासून तू माझा पुत्र आहेस, 'गौरीपुत्र बालगणेश', बालगणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता. माता पार्वती बालगणेशास प्रेमाने कुरवाळून सांगते की " तू माझा लाडका पुत्र आहेस, त्यामुळे मी जे सांगेल त्याचे पालन कर." बालगणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता. पुढे ती असे म्हणाली की, " बाळा, मी स्नान करण्यासाठी आत जात आहे. तू दारावर उभा राहा, कोणासही आत येऊ देऊ नकोस." बालगणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले. माता पार्वती निघून गेल्यावर बाल गणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला. काही वेळानंतर देवाधिदेव महादेव तेथे आले. दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले. परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले. तेवढ्यात बालगणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाला, " थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आज जाऊ शकत नाहीत. मी येथे द्वारपाल आहे."
बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हता...
त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, " अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे, मी शिवशंकर आहे. तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे. त्यामुळे कुणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू तर मुळीच नाही." महादेवाच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की, " मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे ,त्याचे मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असाल तरी मला माझ्या मातेचे बोल महत्वाचे आहेत. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्याच्या या हेकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की, मला गृहात जाऊ दे. मात्र काही केल्या बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हता.
महादेवांचा राग अनावर
आता मात्र महादेवांचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढे रागीट होते त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो, आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जाव करतो; या विचाराने शंकर भगवान संतप्त झाले. या क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले. ते मस्तक लांबवर फेकले गेले.
माता पार्वती रागाने आणि दुःखाने आक्रोश करू लागली.
माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती. परंतु मनातील शंका कुशंकांनी ती बेचैन होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लालेलाल झालेले दिसत होते. झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्विग्न झाली. ती आक्रोश करू लागली. महादेवास म्हणाली, " तुम्ही हे काय केलेत स्वामी? बाल गणेशावर तुम्ही त्रिशूल का उगारले? तो आपलाच पुत्र होता. मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत हवा आहे. तुम्ही त्यास काहीही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकीन."पार्वती माता अगदी उद्विग्न झाली होती .माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हादरले.
बालगणेशाचे नवीन रूप
महादेव आता काय करावे? या विचाराने पछाडून गेले. सर्व देवीदेवता, गण हे देखील भयभीत झाले. माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा तरणोपाय दिसत नव्हता. तेव्हा महादेवाने आपल्या गणांना असा आदेश दिला की, "पृथ्वीलोकांवर सर्वात प्रथम तुम्हास जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या." सर्व गण आपल्या स्वामीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना सर्वप्रथम ' गज ' अर्थात ' हत्ती ' दिसला. गणांनी ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले. महादेवाने ते शिर बालगणेशाच्या देहावर लावले आणि आपल्या मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले. आणि काय आश्चर्य !! बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता-पार्वती बरोबरच सर्वजण आनंदित झाले.
शुभकार्यात प्रथम पूजेचा मान
महादेवाने बालगणेशास जवळ घेतले आणि त्याला असा आशीर्वाद दिला की, " तू सदैव सर्व शुभकार्यात प्रथम पूजिला जाशील. तुझ्यापासूनच प्रत्येक शुभकार्याचा आरंभ होईल." अशाप्रकारे बालगणेश आता " गजानन " म्हणून ओळखला जाऊ लागला.
गणेश जयंती पूजा, या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध
असे म्हणतात की, विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संततीसुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते, तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक समस्या, दुःखापासून मुक्ती मिळते. बुध-केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभ मुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालावे आणि नंतर फुले, दुर्वा, धूप, दिवा इत्यादींनी पूजा करावी. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो. असे म्हणतात.