Ganesh Chaturthi 2023 : यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) 19 सप्टेंबरला आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून हा उत्सव सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. भगवान गणेशाला समर्पित हा उत्सव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर होणार गणेश स्थापना? निषिद्ध चंद्रदर्शनाची वेळ जाणून घ्या.


 


गणपतीची प्रतिष्ठापना 
गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात विघ्नहर्ता घरी आणतात आणि त्याची प्रतिष्ठापना करतात. आज गणपतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. गणपतीच्या स्थापनेची वेळ आणि इतर विशेष गोष्टी जाणून घ्या. यावर्षी गणेश विसर्जन 28 सप्टेंबर 2023, गुरुवार रोजी होणार आहे.



या शुभ मुहूर्तावर गणेशाची प्रतिष्ठापना करा
चतुर्थी तिथी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 01:43 वाजता समाप्त होईल. गणेश प्रतिष्ठापना किंवा पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत असेल. मुहूर्ताचा एकूण कालावधी 02 तास 27 मिनिटे आहे.



गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन केले जात नाही
शास्त्रानुसार चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन टाळावे. पौराणिक मान्यतेनुसार, चंद्र बघितला तर तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक रत्न चोरल्याचा आरोप होता. असे म्हणतात की, जर एखाद्या व्यक्तीने चुकून चंद्रदर्शन पाहिले असेल तर श्रीगणेश त्याला कृष्ण स्यमंतक कथा वाचून किंवा ऐकून क्षमा करतात.



यावेळी चंद्र पाहू नका
एक दिवस आधी, निषिद्ध चंद्रदर्शन वेळ - दुपारी 12:39 ते रात्री 08:10, 18 सप्टेंबर 
कालावधी - 07 तास 32 मिनिटे 
चंद्र दर्शनाची निषिद्ध वेळ - सकाळी 09:45 ते 08:44 
कालावधी - 10 तास 59 मिनिटे 


 


​पौराणिक कथा जाणून घ्या


गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला गणपतीने चंद्राला शाप दिला होता, असे सांगितले जाते. या कथेनुसार, गणपती मूषकासह कैलासावर फेरफटका मारत होते. नुकतेच जेवण झाल्यामुळे गणपतीचे उदर चांगलेच लंबोदर दिसत होते. बालगणेशाच्या त्या रुपाला पाहून चंद्राला आपले हसू आवरले नाही आणि तो जोरजोराने हसू लागला. चंद्राचे उपहासाने हसणे गणपतीला रुचले नाही. मूषकासोबत जात असताना चंद्राने असे उपहासाने हसणे गणपतीला अजिबात आवडले नाही. त्यांनी याबद्दल चंद्राला जाब विचारला. मात्र, चंद्राचे हसणे थांबले नाही. शेवटी गणपतीला राग अनावर झाला. चंद्रदेव, तुम्हाला तुमच्या रुपावर फार गर्व आणि अहंकार आहे ना. यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल, असा शाप दिला. पाहता पाहता एकेक दिवस चंद्राला क्षय होऊ लागला. चंद्र भयभीत झाले. शेवटी ते महादेवांना शरण गेले. त्यानंतर चंद्राने महादेव शिवशंकरांची कठोर तपश्चर्या केली. गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना करून चंद्रदेव दिवसरात्र महादेवांचे नामस्मरण करू लागले. अखेर महादेव प्रसन्न झाले. चंद्रदेवाला महादेवांनी अभय दिले आणि आपल्या मुकुटावर धारण केले. चंद्राच्या प्रार्थनेवरून महादेव ज्योतिर्लिंग स्वरुपात प्रकट झाले आणि सोमनाथ नावांनी प्रसिद्ध झाले. महादेवासह सर्व देवतांनी गणपतीला खूप समजावेल. शेवटी गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. परंतु, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील, त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल, असे स्पष्टपणे सांगितले.


 


गणेश विसर्जन कधी होणार?
यावर्षी गणेश विसर्जन 28 सप्टेंबर 2023, गुरुवार रोजी होणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Dagdusheth Ganpati Aarti : दगडूशेठ गणपतीची आरती, भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण