Dussehra 2024 : शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2024) समाप्तीनंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा (Dussehra 2024) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता, त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात. 


या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी-पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं. पण या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का, की दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून का दिली जातात? जाणून घेऊया.


आपट्याच्या पानाचं महत्व 


दसऱ्या दिवशी सर्व लोक एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्यांच्या पानांची एक पौराणिक कथा आहे. रघुकुलातील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती, पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. हे राजे अरण्यात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी येथे आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक ते राजे तेव्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरुंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेवांनी पृथ्वीवरील आपट्याच्या झाडावर आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या, असे इंद्रदेवांनी सांगितले. त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते असे तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पाने वाटली जातात आणि 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' असं म्हणतात. 


आपट्याच्या पानांचं धार्मिक महत्त्व


आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा (Bauhinia racemosa) आहे. दसर्‍याच्या दिवशी शमीची पानं आपल्या घरात ठेवावीत. यामुळे घरातील हवा शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. या आपट्याच्या पानांची देवाणघेवाण होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होतात.


आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जातो. मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. याची पानं कफ आणि पित्त दोषांवर देखील गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Dussehra 2024 : दसऱ्याच्या दिवशी करा 'हे' 10 उपाय; आर्थिक समस्या होतील दूर, घरात सुख-समृद्धी नांदेल