Diwali 2023: दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबरला आहे. खऱ्या अर्थात दिवाळी (Diwali 2023) सणाला सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. यंदा 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी असणार आहे. या दिवशी सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. आता याचसोबत धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची देखील परंपरा आहे. पण, या दिवशी झाडू खरेदी करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया.


सोने-चांदीसोबत झाडू खरेदीची प्रथा


यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. यासोबतच धन आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगलं आरोग्य आणि समृद्धी लाभते. या दिवशी भांडी, सोने, चांदी, पितळ खरेदी करण्याची धार्मिक प्रथा आहे. याशिवाय या दिवशी झाडू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने घरावर देवी लक्ष्मीची कृपा होते, असं मानलं जातं.


धनत्रयोदशीला का केली जाते झाडूची पूजा?


झाडूला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते, असंही मानलं जातं. याशिवाय घरातून गरिबीही दूर होते. दिवाळीला झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की, असं केल्याने लक्ष्मी घरातून बाहेर पडू शकत नाही. यासोबतच काही लोकांचा असाही विश्वास आहे की, या दिवशी घरात झाडू आणल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मकता पसरते. त्यामुळे नत्रयोदशीला झाडू खरेदी करुन त्याची पूजा करणं शुभ मानलं जातं.


घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात झाडूचा नियमित वापर केला जातो. स्वच्छता ही देवी लक्ष्मीला आकर्षित करते असं म्हटलं जातं. संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळी लक्ष्मी घरात येते, असं म्हटलं जातं. त्यामुळे घरी संध्याकाळच्या वेळी केर काढला जात नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023 Vastu Tips: दिवाळीपूर्वी घराची वास्तू करा नीट; बेड, डायनिंग टेबल आणि मंदिर कोणत्या दिशेला असावे? जाणून घ्या