Dasara 2023: हिंदू धर्मात दसरा (Dasara) या सणाला विशेष महत्त्व आहे. यावेळी दसरा आज, म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध केला, जो अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता दुर्गेनेही महिषासुराचा वध केला होता.
दसऱ्याच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी करणं शुभ
दसऱ्याच्या दिवशी देशभरात विविध ठिकाणी रावण दहन केलं जातं. या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते. या दिवशी वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं. दसरा हा सण सामाजिक ऐक्य, सहकार्य आणि सौहार्दाचं प्रतीक मानला जातो.
शस्त्रपूजनासाठी शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केलं जातं. यंदा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच, 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:58 ते 02:43 पर्यंत शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त असेल. तर, अभिजीत मुहूर्त हा 24 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 11:43 ते दुपारी 12:28 पर्यंत आहे.
रावण दहनाचा मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. यंदा रावण दहनाची वेळ 24 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे. रात्री 8 वाजून 54 मिनिटांपर्यंत रावण दहन केलं जाऊ शकतं.
दसऱ्याच्या दिवशी ही कामं करणं मानलं जातं शुभ
ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, दसरा किंवा विजयादशमी ही तिथी मानली जाते जी सर्व सिद्धी देते. त्यामुळे या दिवशी केलेलं प्रत्येक शुभ कार्य फलदायी मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचे अक्षरलेखन, घर किंवा दुकानाचं बांधकाम, घरकाम, जावळ भरणं, नामकरण सोहळा, कान टोचणं, यज्ञोपवीत संस्कार आणि भूमिपूजन यासारखे उपक्रम करणं शुभ मानलं जातं. या दिवशी विवाह विधी केले जात नाहीत, ते निषेधपर मानले जातात.
दसऱ्याचं महत्त्व
हिंदू मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून माता सीतेला त्यांच्या तावडीतून मुक्त केलं, अशाप्रकारे रावणाच्या दुष्टकर्मांचा अंत करत त्यांनी विजय मिळवला. या कारणास्तव या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. या अभूतपूर्व विजयामुळे या सणाला विजयादशमी असंही म्हटलं जातं.
हेही वाचा: