Israel Hamas Attack : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाला 17 दिवस उलटून गेले आहेत. दोन्हीमधील संघर्ष सुरुच आहे. असं असताना दोन्ही बाजूच्या नागरिकांचे मात्र हाल होतं आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर हमासच्या हल्ल्यातही इस्रायलच्या निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि या युद्धाला तोंड फुटलं. दरम्यान, या युद्धामुळे इस्रायली जनता मात्र, नेत्यानाहू यांच्या विरोधात असल्याचं समोर येत आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी युद्धभूमीमध्ये केलेल्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये नागरिकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेतन्याहू यांच्या विरोधात जनमत
इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी इस्रायलच्या नागरिकांची भावना आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्याच्या अपयशाची जबाबदारी सार्वजनिकपणे स्वीकारली पाहिजे असं बहुसंख्य इस्रायली लोकांना वाटतं. स्थानिक वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात हे दिसून आलं आहे. इस्रायली लष्कर (IDF) आणि शिन बेटच्या प्रमुखांनी संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्यांप्रमाणेच युद्धाची जबाबदारी स्वीकारली आहे, असं इस्रायली नागरिकांचं म्हणणं आहे. 80 टक्के इस्रायली लोकांच्या मते, नेतन्याहू यांनी त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. सर्वेक्षणानुसार केवळ 8 टक्के सामान्य जनतेला वाटते की, पंतप्रधानांनी असं करू नये.
पंतप्रधान होण्यासाठी कोण अधिक योग्य?
भावी पंतप्रधान होण्यासाठी कोण अधिक योग्य आहे, असे विचारले असता इस्रायली जनतेचं मत नेत्यानाहू यांच्या विरोधात असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान पदासाठी नॅशनल युनिटी पक्षाचे नेते बेनी गँट्झ यांच्या बाजूने 49 टक्के लोकांनी मत दिले आहे. तर, 28 टक्के लोकांनी नेतन्याहू यांना निवडले आहे. इतर नागरिकांनी मत दिलेलं नाही. युद्धाबाबत 65 टक्के इस्रायली नागरिकांनी गाझा पट्टीतील जमिनीवरील हल्ल्याचे समर्थन केले, तर 21 टक्के विरोध केला आहे. याव्यतिरिक्त, 51 टक्के लेबनॉनमध्ये हमास आणि हिजबुल्लाह दहशतवाद्यांशी वाढत्या चकमकींनंतर उत्तर आघाडीवर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. तर, 30 टक्के मर्यादित हल्ले व्हावे असं मानतात.
इस्रायल हल्ला अधिक तीव्र करणार
इस्त्रायलने युद्धाच्या गाझा पट्टीमध्ये बॉम्बहल्ले वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायली सैन्य सातत्याने हमासच्या ठिकाणांवर हल्ले करत आहेत. इस्रायली सैन्य आता जमिनीवरून हल्ला करण्याची योजना आखत आहे. पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासला पराभूत करण्यासाठी इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्याची योजना आखण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :