Chanakya Niti : चाणक्य नीतिचा (Chanakya Niti) वापर आजही प्रत्येक ठिकाणी केला जातो. याचं कारण म्हणजे चाणक्य नितीत सांगितलेले विचार हे माणसाच्या सुखी जीवनासाठी, आणि भविष्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चाणक्य नीतिचा वापर केला जाऊ शकतो. एक प्रकारे चाणक्य नीति आपल्याला समाजाचा आरसाच दाखवते. यासाठीच म्हणतात की, ज्यांनी चाणक्यांच्या विचारांचं आचरण केलं त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं. 


आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधांवर देखील भाष्य केलं आहे. असं म्हणतात की, नवरा बायकोचं नातं हे फक्त एका जन्मासाठीच नाही तर पुढच्या सातही जन्मासाठी बांधलं गेलं आहे. 


पती-पत्नी म्हणजे एका रथाची दोन चाकं   


आचार्य चाणक्य म्हणतात, पती-पत्नी दोघेही एकमेकांना पूरक असले पाहिजेत. कारण, पती-पत्नीचं नातं म्हणजे एका रथाची दोन चाकं. यामध्ये एक चाक जरी डगमगलं तरी दुसरं चाक किंवा रथ पुढे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जर नवरा-बायकोने वैवाहिक संबंध नीट सांभळले नाहीत तर संपूर्ण कुटुंब विस्कळीत होऊ शकतं. चाणक्य पुढे म्हणतात की, कुटुंबातील सुख-शांती ही केवळ नवरा बायकोमधील सामंजस्यपणा, समजूतदारपणा यावर अवलंबून आहे.  


तसेच ज्या घरात पती-पत्नीचे नाते सौहार्दाचे नसते, एकमेकांमध्ये संवाद नसतो किंवा समन्वय नसतो, त्या घरात लक्ष्मीचाही वास राहत नाही. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पती-पत्नीने चाणक्याच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.


सुखी वैवाहिक जीवनासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात


एकमेकांचा आदर करा 


हे नियम सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, पती-पत्नीच्या नात्यात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. चाणक्य म्हणतात, पती-पत्नी दोघांनीही एकमेकांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. कारण ज्या नात्यात आदर असतो ते नातं सर्वात सुंदर असतं. असे केल्याने तुमचे नातेही घट्ट होते.


संयमाची गरज 


चाणक्य यांच्या मते, वैवाहिक जीवनात पती-पत्नी दोघांनीही संयम राखणं खूप गरजेचं आहे. जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी दोघांनी धीर धरून वाईट प्रसंगाला तोंड देत पुढे जायला हवे. ज्या नात्यात संयम नसतो ते नातं कधीच टिकत नाही असं चाणक्य सांगतात.  


अहंकार बाजूला ठेवा 


पती-पत्नीने नेहमीच प्रत्येक काम एकमेकांच्या साथीने मनात अहंकार न ठेवता केले पाहिजे. कारण अहंकारामुळे 'तू-तू-मैं-मैं' अशी परिस्थिती निर्माण होते आणि नात्यात अंतर वाढत जातं. 


वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका 


पती-पत्नीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. पण, तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या एकमेकांपुरत्या मर्यादित असणं गरजेचं आहे. वैयक्तिक बाबी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशी किंवा इतर व्यक्तीशी शेअर करू नयेत हे सुखी वैवाहिक जीवनासाठी, पती-पत्नी दोघांनीही  लक्षात घेतलं पाहिजे.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Chanakya Niti : मूर्ख मित्रापेक्षा हुशार शत्रू चांगला! आचार्य चाणक्य असं का म्हणतात? कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल