Chaitra Navratri 2024 Kanya Pujan Vidhi : नवरात्रीच्या 9 दिवसांत माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते, त्यात नवरात्रीमध्ये कन्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. याशिवाय कन्येला देवी लक्ष्मीचं रूपही मानलं जातं. कन्या पूजन हे सहसा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केलं जातं, परंतु काही लोक नवरात्रीच्या (Navratri 2024) इतर दिवशीही कन्यापूजा करतात. मग आता नवरात्र अष्टमी आणि नवमी तिथी नेमकी कधी? आणि कन्या पूजन कधी करावं? जाणून घेऊया

अष्टमी आणि नवमी कधी? कन्या पूजन कधी करावं?

पंचांगानुसार, नवरात्री अष्टमी तिथी 15 एप्रिलला दुपारी 12:12 वाजता सुरू झाली आणि ती 16 एप्रिलला दुपारी 1:22 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, 16 एप्रिलला अष्टमी तिथी असल्याने 16 एप्रिललाच कन्या पूजन केलं जाईल. तर नवमी तिथी 17 एप्रिलला असेल.

कन्या पूजा कशी करावी?

शास्त्रानुसार, कन्यापूजा करताना मुलींचं वय 2 ते 10 वर्ष असायला पाहिजे. कन्यापूजेत 9 मुलींचं असणं अत्यंत शुभ मानलं जातं. कन्या पूजनात मुलींना सर्वप्रथम स्वच्छ पाटावर बसवावे. यानंतर त्यांचे पाय धुऊन आणि त्यांचे पाय पुसून घ्यावे, त्यांना कुंकू लावावं.

यानंतर आपल्या क्षमतेनुसार मुलींना खाऊ घाला. खीर, पुरी, मिठाई अशा प्रकारचे व्यंजन त्यांना द्या. जेवणानंतर मुलींना दक्षिणा म्हणून फळं आणि पैसा द्यावे आणि त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींचं महत्त्व

शास्त्रानुसार कन्या पूजेमध्ये 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुली माँ दुर्गेच्या विविध रूपांचे प्रतिनिधित्व करतात. दोन वर्षांच्या मुलीला कुमारी म्हणतात. तीन वर्षांच्या मुलीचं नाव त्रिमूर्ती, चार वर्षांच्या मुलीचं नाव कल्याणी, पाच वर्षांच्या मुलीचे नाव रोहिणी, सहा वर्षांच्या मुलीचं नाव माता कालिका, सात वर्षांच्या मुलीचं नाव चंडिका, आठ वर्षांच्या मुलीचं नाव शांभवी आणि नऊ वर्षांच्या मुलीला देवी दुर्गा आणि दहा वर्षांच्या मुलीला सुभद्रा म्हणतात.

कन्या पूजा हा मुलींचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे. कन्येची पूजा केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दु:ख दूर करते, अशी मान्यता आहे, यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी देखील टिकून राहते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीत करा 'हे' उपाय, राहू-केतू आणि शनि होतील शांत; संपत्तीतही होईल वाढ