Chaitra Navratri Shubh Muhurat Vidhi 2023 : हिंदू धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते. यादिवशी गुढी पाडवाही (Gudi Padwa 2023) साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरुवात होते. हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते. वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात, त्यात चैत्र आणि शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये पूजा केल्याने दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं. यंदा उद्यापासून (22 मार्च 2023) बुधवारपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. चैत्र नवरात्रीची घटस्थापना, शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धती याबाबत अधिक माहिती वाचा.


चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्र सुरू होते. यंदा चैत्र नवरात्री 22 मार्चला सुरु होणार असून 30 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. चैत्र नवरात्रीचा शुभ मुहूर्त, घटस्थापना, विधी, दुर्गापूजेचे महत्त्व काय आहे जाणून घ्या.


नवरात्रीचा शुभ मुहूर्त  (Chaitra Navratri Ghatasthapana Muhurat)


21 मार्चला रात्री 11.04 वाजता प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल, त्यामुळे घटस्थापना 22 मार्चला होईल. नवरात्रीची सुरुवात 22 मार्चला सूर्योदयानंतर घटस्थापना करून होईल.


चैत्र नवरात्रीचं महत्त्व (Chaitra Navratri Ghatasthapana Muhurat)


चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. या दिवशी ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली असंही मानलं जातं. दूर्गामातेचं वाहन सिंह आहे. मात्र देवी पृथ्वीवर आल्यावर तिचं वाहन बदलतं, असं म्हटलं जातं. यंदा दूर्गामाता बोटीतून पृथ्वीवर येणार आहे. या वर्षी मातेचं आगमन नौकेतून होणार आहे. हे सुख-समृद्धी प्रतिक समजलं जातं. नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची विधीवत पूजा केली जाईल. यंदा चैत्र नवरात्रीला चार ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. हा योगायोग 110 वर्षांनंतर घडत आहे. 


घटस्थापनेचं महत्त्व


घटस्थापनेला आपल्याकडील कृषी संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. घटस्थापना म्हणजे प्राचीन कृषी संस्कृतीतला महत्वाचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदाला आणि उत्साहाला भरती आलेली असते. घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात देवीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा करुन एकप्रकारे त्याप्रति भक्तीभाव प्रकट केला जातो.  


चैत्र नवरात्री घटस्थापनेचा शुभ मुहूर्त (Chaitra Navratri Ghatasthapana Muhurat)


चैत्र नवरात्री 22 मार्चला सुरू होऊन 30 मार्चपर्यंत चालणार आहे. घटस्थापना हा नवरात्रीतील एक महत्त्वाचा विधी आहे. हे नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते. नवरात्रीच्या सुरुवातीला ठराविक कालावधीत घटस्थापना करण्यास शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. घटस्थापना हे देवी शक्तीचं आवाहन आहे. त्यामुळे घटस्थापना चुकीच्या वेळी केल्याने देवीचा कोप होऊ शकतो, असं मानलं जातं. घट किंवा कलशाची स्थापना नवरात्रीच्या शुभ मुहूर्तानुसार करावी. 


घटस्थापना मुहूर्त, शुभ वेळ : सकाळी 06:23 ते 07:32 पर्यंत


कालावधी : 01 तास 09 मिनिटे


प्रतिपदा तिथी प्रारंभ : 21 मार्च 2023 रात्री 10:52 वाजता


प्रतिपदा तिथी समाप्ती : 22 मार्च 2023 रात्री 08:20 वाजता


मीना लग्न प्रारंभ : 22 मार्च 2023 सकाळी 06:23 वाजता


मीना लग्न समाप्ती : 22 मार्च 2023 सकाळी 07:32 वाजता


चैत्र नवरात्री घटस्थापना विधी आणि पद्धत  (Chaitra Navratri 2023 Ghatasthapana Vidhi)


कलश हे भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. दुर्गामातेची पूजा करण्यापूर्वी कलशाची पूजा केली जाते. पूजेच्या ठिकाणी कलशाची स्थापना करण्यापूर्वी ते स्थान गंगाजलाने स्वच्छ केलं जातं, त्यानंतर सर्व देवी-देवतांना आवाहन केलं जातं.


अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला सकाळी लवकर स्नान करून उपासना आणि उपवासाचा संकल्प करावा.  पूजास्थान गंगाजलाने पवित्र करा. एका पाटावर लाल वस्त्र पसरवा आणि त्यावर देवीची प्रतिमा ठेवा. कलशाला हळद-कुंकू लावा. त्यानंतर कलशात सुपारी, फुलं, अत्तर, पाच रत्न, नाणी आणि पाच प्रकारची पानं ठेवा. पानं कलशाबाहेर राहतील याची काळजी घ्या. थाळी पूर्णपणे तांदळाने भरून त्यावर ठेवा. कलशात आंबा किंवा अशोकाची पानं लावा. 


त्यानंतर एका भांड्यात माती टाकून त्यात गहू टाका. त्या भांड्यामध्ये कलश ठेवण्याची जागा ठेवा. कलश मधोमध ठेवून त्यावर स्वस्तिक चिन्ह काढा. लाल कपड्यात नारळ गुंडाळून रक्षासूत्राने बांधा. हा नारळ आपल्याकडे तोंड करून तांदळाने भरलेल्या थाळीवर ठेवा. देवीदेवतांना आवाहन करून कलशाची पूजा करा. कलशाला हळद-कुंकू लावा. अक्षता आणि फुलं वाहा. अत्तर आणि नैवेद्य आणि फळ-मिठाई अर्पण करा. तसेच गहू पेरलेल्या ठिकाणी नियमित पाणी टाका. एक दोन दिवसानंतर अंकुर फुटताना तुम्हाला दिसतील.