Bhaubeej 2024 : आनंदाचा आणि उत्साहाचा असा दिवाळीच्या (Diwali 2024) सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत भाऊ-बहिणींना विशेष आकर्षण असतं ते भाऊबीजेचं (Bhaubeej). दिवाळीची समाप्तीच भाऊबीजेने होते. भाऊबीजेचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी असतो. हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो.
भाऊबीज कधी आहे?
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी सुरु होईल. तर 3 नोव्हेंबरला रात्री 10 वाजून 6 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार भाऊबीजेचा सण हा 3 नोव्हेंबरला साजरा केला जाईल. 3 तारखेला सकाळी 11 वाजून 39 मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहिल. तर यानंतर शोभन योग असणार आहे. त्यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल.
भाऊबीजेचे महत्त्व
भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण मानला जातो. या सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणींमधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे आहे. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी ऊ-बहिणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करतील असे वरदान दिले. मृत्यूनंतर त्याला यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अशी देखील मान्यता आहे की, नरकासुराचा वध करुन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले होते. यावेळी त्यांची बहिण सुभद्रा हिने त्यांना फुले, मिठाई आणि दिवे लावून स्वागत केले होते. कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्य प्राप्त होण्याची प्रार्थना केली होती.
पूजेची परंपरा
भाऊबीजेच्या दिवशी बहीण सकाळी आंघोळ करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते, आणि त्यावर पाच विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवते. नंतर भावाच्या हातावर धांगा बांधून पाणी शिंपडत भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करते. काही ठिकाणी, बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावत त्याला औक्षण करते, आणि भावाच्या मनगटावर धागा बांधते. मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते. आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांच्या माळा, मिठाई, धागा, केळी असावी. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :