Bhagwat Ekadashi 2024 : प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी (Ekadashi) म्हणतात. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं. या दिवशी उपवास करतात, विष्णू देवाची पूजा करतात. एकादशीला ठेवलेला उपवास दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो. प्रामुख्याने वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तीभावाने पाळलं जातं. यंदा गुरुवार, 7 मार्च 2024 रोजी भागवत एकादशी आहे.


यंदा कृष्ण पक्षात एकादशीचे दोन भेद आले आहेत - स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी. ज्या पक्षात एकादशीचे दोन भेद येतात, त्यात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असते. यंदा हा योग जुळून आला आहे. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असतं, पण भागवत एकादशीला नाव नसतं.


वारकरी सांप्रदायात भागवत एकादशीला विशेष महत्त्व


वारकरी सांप्रदाय भागवत एकादशी नियमाने साजरी करतो. विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशीच्या दिवशी उपवास ठेव शकतात. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून बहुतेक विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम आणि श्रद्धेने केलं जातं. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते, असं म्हणतात. भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असं म्हणतात.


भागवत एकादशी पूजाविधी (Bhagwat Ekadashi Puja Vidhi)


भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून अंघोळ करुन चांगले कपडे परिधान करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा. चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवा. विष्णू देवाची फळं-फुलं, नारळ, पान-सुपारीने पूजा करा. पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा.


एकादशी व्रताचे महत्त्व (Ekadashi Vrat Significance)


एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला करा 'या' वस्तूंचं दान; महादेवाची राहील सदैव कृपा, कधीही भासणार नाही पैशांची कमी