Ram Mandir Prasad : रामललाच्या अभिषेकसाठी येणाऱ्या निमंत्रित पाहुण्यांना एका खास बॉक्समध्ये प्रसाद मिळणार आहे. हा प्रसाद रामलल्लाच्या (Ram) अभिषेक समारंभासाठी आमंत्रित पाहुण्यांसाठी खास असणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पाहुण्यांना देण्यासाठी प्रसादाची 15 हजार पाकिटं तयार केली आहेत. या प्रसादाच्या पाकिटात गुळासोबत रेवडी, रामदाणे चिक्की, अक्षता, दिवा आणि रोळी देखील प्रसाद म्हणून मिळणार आहे. हा प्रसादाचा बॉक्स खास पद्धतीने पॅक करण्यात आला आहे आणि प्रसादाच्या पाकिटात विशेषत: विष्णूला प्रिय असलेली तुळशीची डाळही देखील देण्यात आली आहे.


प्रसादात आणखी खास काय?


यासोबतच रामललाच्या प्रसादात वेलचीचे दाणेही देण्यात आले आहेत. सध्या रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे दिले जात आहेत, त्यामुळे त्याचाही प्रसादात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या प्रसादाच्या पाकिटात रक्षासूत्र देखील दिले जाते. यासोबतच 'राम दिवा' देखील पॅकिंगमध्ये असेल, ज्याचा वापर करून लोक राम ज्योती पेटवू शकतात. याशिवाय सुक्या मेव्याच्या लाडूंचाही या प्रसादात समावेश आहे.


भव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज


प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सजली असून रामनगरी यावेळी भक्तिरसात तल्लीन झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येतील धरमपथ आणि रामपथ येथून भाविकांची मोठी गर्दी होत असताना, पोलीस रस्त्यावर गस्त घालताना दिसतात. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितलं की, सजावटीसाठी फुलांचा "समृद्ध साठा" वापरण्यात आला आहे आणि 22 जानेवारी रोजी होणार्‍या सोहळ्याच्या दृष्टीने मंदिर सजवण्यासाठी फुलांचे विशेष डिझाईन तयार करण्यात आले आहे.


रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा मुहूर्त कोणता?


अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. अवघ्या 32 सेकंदाचा मुहूर्त या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलाय. तसेच मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त असणार आहे. 


प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?


सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Ramlala Pran Pratishtha at home : उद्या 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठादिनी घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य