Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा (Akahaya Tritiya) उत्सव येत्या 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षाच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पौराणिक काळात अक्षय्य तृतीयेला पुण्य तिथी मानण्यात आलं आहे.
यावेळी अक्षय्य तृतीयेला रवियोग, धन योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, षष्ठ योग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला तयार होत असलेल्या शुभ योगाचे महत्त्व सांगताना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांचे पालन केल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक कार्यात यश मिळते. आता हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
दान करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करा कारण या दिवशी केलेले दान चिरस्थायी फळ देते. या दिवशी भगवान विष्णू आणि पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध आणि दान करावे. या दिवशी मातीचे भांडे, दही, दूध, तांदूळ, सत्तू, खीर, श्रृंगार इत्यादी वस्तू दान करा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.
'या' उपायामुळे नोकरी आणि व्यवसाय वाढतो
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सकाळी दाराच्या चौकटीवर हळदीचे पाणी टाकावे. यानंतर केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करावी आणि खीर अर्पण करावी. असे केल्याने आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात चांगली वाढ होते.
'या' पद्धतीद्वारे धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एक नारळ बसवा आणि विधिवत पूजा करा. यानंतर लाल कपड्यात नारळ बांधून कपाट, तिजोरी इत्यादी ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनप्राप्तीचे नवीन मार्गही तयार होतात.
'या' उपायाने व्यवसायात प्रगती होते
जर व्यवसाय मंदावत असेल तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 27 गोमती चक्र लावून लक्ष्मीची पूजा करा. यानंतर सर्व गोमती चक्रे रेशमी किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य गेटवर बांधा. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात चांगली वाढ होईल आणि अपेक्षेप्रमाणे नफा मिळू लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :