Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) उत्सव येत्या 10 मे रोजी साजरा केला जाणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी होते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी तुम्ही जे काही पुण्य काम, धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळतं. त्याचबरोबर लग्न समारंभ, विधी, पूजा, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग आणि रवि योगसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजेत. यामुळे तुमच्या जीवना सुख-समृद्धी आणि शांती टिकून राहते. तसेच, संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धन-धान्य अगदी कसलीच कमतरता भासत नाही.
'अशा' पद्धतीने लक्ष्मी नारायणाची पूजा करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करावी. तसेच, या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत. त्यानंतर तुपाचे 9 दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधीवत पूजा करावी.
'या' पाठाचं पठण करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्त पाठाचं पठण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात धन-धान्य, पद, यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच, जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्त्रोताचं पठण नक्की करावं.
तिजोरीत 'या' वस्तू ठेवा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून ठेवा. त्यानंतर त्याची विधीवत पूजा करा. पूजा केल्यानंतर नारळाला धन-संपत्तीबरोबर तिजोरीत ठेवा. तसेच, एकाक्षी नारळाला लाल कापडात बांधून व्यवहाराच्या तिजोरीत ठेवा.
गरजूंना दान करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्य मिळतं. या दिवशी दान करणे, तर्पण करणे आणि तीर्थ स्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर पितृच्या नावाने श्राद्ध केलं तर त्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं. तसेच, पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापांपासून मुक्ती मिळते.
पवित्र गंगा स्नान करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टींबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे तुम्हाला फळप्राप्ती मिळेल. तसेच, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
या पाठाचं पठण करा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्री रामचरितमानसमधील अरण्य कांडचे पठण करणं शुभ मानलं जातं. या अध्यायात भगवान राम साधु संत आणि ऋषीमुनींचे दर्शन करतात. आणि ज्ञान प्राप्त करतात. या कांडाचं पठण केल्याने भगवान रामाचा आशीर्वाद मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: