Yavatmal News : बनावट किटकनाशकं आणि खतं तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना यवतामळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथे घडली आहे. एका भाड्यानं घेतलेल्या घरामध्ये बनावट किटकनाशक, खते तयार तयार केली जात होती. तसेच तयार केलेल्या खतांची विक्री केली जात होती. घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. यामध्ये तब्बल सात लाख 26 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, जावेद अन्सारी (21) व दिनेश कुंडलवार अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार पांढरकवडा केळापूर तालुक्यात बनावट खत, किटकनाशक औषधी, विक्री होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे यवतमाळ, जिल्हा नियंत्रण अधिकारी शिवा जाधव यांना देखील या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पांढरकवडा येथील कृषी अधिकारी राकेश दासरवार यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी मिळून घटनास्थळी धाड टाकली. त्या ठिकाणी गुजरात आणि तेलंगणा राज्यातून आणलेली बनावट किटकनाशकं तसेच बनावट खतांची पोती आढळून आले. कृषी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण मालाची मोजमाप करुन सुमारे 7 लाख 26 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दोन्ही आरोपीविरुद्ध कृषी अधिकाऱ्यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांगल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी सध्या पेरणी करत आहेत. चांगल्या पावसामुळं शेतकरी खते खरेदी करत आहेत. खतांच्या दुकानासमोर खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बोगस खतांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या विरोधात कृषी अधिकारी कारवाई करत आहेत.