Unseasonal Rain News : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका लागत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यसह विजांच्या कटकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काढणीला आलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, कोल्हापुरमध्ये पन्हाळा रोडवरील करवीर तालुक्यातील केर्ली इथं चालत्या चारचाकीवर वडाच्या झाडाची भली मोठी फांदी पडून गाडीचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही. ही गाडी शिंगणापूरहून पन्हाळ्याला चालली होती. त्यावेळी ही घटना घडली. ऋषिकेश रोटे असं चालकाचं नाव आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी वादळी वाऱ्यानं झाडे पडल्याची घटना घडली होती. दरम्यान कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेचा गुलाल धुऊन काढला आहे. चैत्र यात्रेनंतर हमखास पाऊस पडत असल्याचं भाविकांचं मत आहे.
दरम्यान, दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगलाच अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग च्या काही भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. गोव्यातही मुसळधार अवकाळी झाला आहे. गोव्यातील फोंडा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील काही भागात गारांचा सुद्धा पाऊस झाला. सकाळपासूनच उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्धा ते पाऊण तास कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस आणि वारा सुरु होता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Narendra Singh Tomar : शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले, कृषीमंत्री तोमर यांचा दावा
- Agriculture Award : 198 शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कारांनी होणार सन्मान, 2 मे ला नाशिकमध्ये राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा