Agriculture Award News : राज्यातील कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं विविध कृषी पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या 2 मे ला नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात 198 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 


दरम्यान, 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. गेल्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. तो कार्यक्रम आता 2 मे रोजी होणार आहे. कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन- उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. 


नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वाजता तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी, फलोत्‍पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.


पुरस्‍कारार्थींना रोख रकमेसोबत स्‍मृतीचिन्‍ह,सन्‍मानपत्रासह सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. सर्व पुरस्‍कारप्राप्‍त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्‍हणून कृषी विभागातील विविध योजनांमध्‍ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. 2020 पासून विविध कृषी पुरस्‍कार मार्गदर्शक सूचनांमध्‍ये बदल करण्‍यात आले असून, राज्याच्या सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी विभागनिहाय एक याप्रमाणे हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ शेतकरी पुरस्‍कारांची संख्‍या 25 वरुन 40 करण्यात आली असून  जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार संख्‍या 5 वरुन 8 तर वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार 3 वरुन 8,  कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्‍कार 9 वरुन 8 करण्‍यात आली आहे. 2020 पासून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे युवा शेतकरी पुरस्‍कार देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सागितले.



 'या' पुरस्कारांनी शेतकऱ्यांचा होणार सन्मान


 डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार - 4 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 75 हजार रुपये)
 वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार - 28 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)
 जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार - 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी  50 हजार रुपये)
 कृषीभूषण (सेंद्रिय शेती) - 23 पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
 वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार - 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 30 हजार रुपये)
 उद्यानपंडीत पुरस्‍कार - 25 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 25 हजार रुपये) 
 वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ  शेतकरी पुरस्‍कार - सर्वसाधारण गट - 57 पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट - 18 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 11 हजार रुपये)
राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात - 9 पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्‍कारार्थी - प्रत्‍येकी प्रथम क्रमांक - 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्‍न पुरस्‍कार - 7 पुरस्‍कारार्थी