Narendra Singh Tomar : देशातील सर्व समृद्ध शेतकऱ्यांनी कृषी दूत म्हणून गावोगावी जावे असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे. तुमच्या मार्गदर्शनाने आणि प्रयोगाने गावातील सर्वसामान्य शेतकरी जोडला जाईल. त्यामुळे छोटा शेतकरी देखील समृद्ध होऊन देशाच्या जीडीपीमध्येही शेतीचे योगदान वाढेल असे तोमर म्हणाले. तसेच अर्थकारण मजबूत होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. तसेच जे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, योजनांचा लाभ घेत आहेत त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. तसेच त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले असल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला आहे.


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत 'किसान भागीदारी, प्राथमिक हमारी' या मोहिमेचा शुभारंभ कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तोमर यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दुप्पटच नाही तर 10 पटीने वाढले असल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला आहे.  तसेच उत्तन्न वाढलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना जागरुक केलसे पाहिजे जेणेकरुन तेही समृद्ध होतील असेही कृषीमंत्री म्हणाले. सरकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी संबंधित योजनांशी संबंधित शेतकरी समृद्ध झाले आहेत. त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न दोन ते दहा पटीने वाढले आहे. हे शेतकरी कृषी दूत म्हणून गावोगावी गेले तर शेतीची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे ते म्हणाले.


 






दरम्यान, आज शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारात किमान आधारभूत किंमतीपेक्षा चांगला भाव मिळत आहे. गहू व मोहरीला चांगला भाव मिळत असून, मोहरीच्या तेलातील भेसळ बंद झाल्याने शेतकरी सुखावला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची इतर पावलेही सरकार उचलणार असल्याचे तोमर म्हणाले. ग्रामीण भागात कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी आठ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. यासह साठवणूक व इतर सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये बँकांचे योगदान कौतुकास्पद आहे.


यावेळी बोलताना तोमर यांनी नैसर्गिक शेतीवर भर देण्याचे आवाहन केले. नैसर्गिक शेतीमुळे शेतीवरील खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल. सध्या 38 लाख हेक्टर जमिनीवर सेंद्रिय शेती केली जात असून, त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. रासायनिक खतांसाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत, त्या देशांनी खते देण्यास नकार दिल्यास समस्या निर्माण होईल असेही कृषीमंत्री तोमर म्हणाले.