Vidharbha Weather Update :  काही दिवसांपूर्वीच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) आधीच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असतानाच आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी बातमी पुढे आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाचा  (Cyclone Michaung) परिणाम देशासह विदर्भावर (Vidarbha)  देखील दिसून येणार आहे. आगामी 5 ते 9  डिसेंबर दरम्यान विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 6 डिसेंबरला त्याची तीव्रता अधिक परिणामकारक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Regional Meteorological Centre) व्यक्त केलाय. या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलंय. परिणामी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना देखील जिल्हा कृषी हवामान केंद्राने दिल्या आहेत. 


5 ते 9 डिसेंबरला अवकाळी पावसाची हजेरी


अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून सावरत नाही तोच राज्यासह विदर्भातील अनेक भागात अवकळी पावसाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणावरही परिणाम झाल्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपुर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र आणि नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, 5 ते 9 डिसेंबर दरम्यान पुढील पाच दिवस आकाश आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर 5 आणि 7 डिसेंबरला  तुरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता अधिक असल्याचे  हवामान विभागाच्या वतीने संगण्यात आले आहे. तसेच 6 डिसेंबरला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. तर 8 ते 9 डिसेंबरला  हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांनी घ्यावी ही खबरदारी 


पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे, कृषी रसायनांच्या संबंधित कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी फवारणीची कामे,  तसेच उभ्या पिकामध्ये खते देण्याची कामे पुढील 2 ते 3  दिवस पुढे ढकलावी. असा सल्ला  देण्यात आला आहे. तसेच परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी आणि मळणी करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मळणी ची कामे शक्य नसल्यास आणि परिपक्व अवस्थेतील कापणी केलेले धान पिक शेतात पसरून ठेवले असल्यास, शेतामध्ये उंचवटा असलेल्या ठिकाणी गोळा करून ठेवावा.  कापणी केलेला शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र,आणि  केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आल्या आहे.


हवामान परिस्थीतीचा अंदाज बघून करावी कामे 


स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थीतीचा अंदाज घेऊन कापूस वेचणी सुरु ठेवावी. वेचणी तसेच वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी, साठवणुकीसाठी आणि पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक किंवा गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. वेचणी केलेला कापूस कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. यासह गहू, मोहरी, जवस, फळबागा तसेच भाजीपाला पिकामध्ये ओलित करणे हे  2 ते 3 दिवस पुढे ढकलावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेड मध्येच साठवावा.अशा सूचना जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र,आणि  केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :