बुलढाणा :  राज्यातील सहा लाख हेक्टरवरील तूरीचं (Tur Crop) पीक धोक्यात आले आहे. यंदा पावसाने पाठ फिरवली.. आणि शिवारातलं सोनं मातीत गेलं.. दुबार पेरणी करुन कसंतरी पीक जपलं होतं... पण त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव झालाय. बुलढाण्यातल्या तूरीच्या पिकाची काय अवस्था झालीये. आणि पाण्याअभावी लातूरमध्ये पिकांनी कशी मान टाकली आहे. कमी अधिक पाऊस व बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामातील पिके गेल्यानंतर आता तुरीच्या पिकाकडून शेतकऱ्याला अपेक्षा होती. मात्र बदलत्या हवामानामुळे तुरीवरही आता " फायटोप्थोरा ब्लाईट " या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने राज्यातील सहा लाख हेक्टर वरील तुरीचे पीक धोक्यात आले आहे.


राज्यात अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व खान्देशातील अनेक भागात कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके ही आली नाहीत शेतकऱ्यांना तुरीच्या पिकाकडे  आता थोडीफार अपेक्षा होती. राज्यभरात सहा लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तुरीचे पीक हे हिरवेगार होते मात्र याही पिकावर बदलत्या वातावरणामुळे "फायटोप्थोरा ब्लाईट " या बुरशीजन्य रोगाने शिरकाव केल्याने आता हिरवेगार तुरीचे पीक पिवळे पडून सुकू लागले आहे. यामुळे मात्र आता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.


तुरीचे पीक हे जवळपास 50 ते 60 टक्के उत्पादन घटलं


 एक आठवड्यापूर्वी हिरवीगार असलेली तूर काही दिवसातच सुकून पिवळी पडत आहे. राज्यभरात सहा लाख हेक्टर वर तुरीचे पीक लागवड करण्यात आली आहे मात्र या रोगामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे." फायटोप्थोरा ब्लाईट "या रोगाचा प्रादुर्भाव दिसताक्षणी शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असा आवाहन कृषी अधिकारी करताना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षीही याच रोगाने तुरीचे पीक हे जवळपास 50 ते 60 टक्के उत्पादन घटलं होतं आणि याही वर्षी हीच भीती आता निर्माण झाली आहे.


सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार


असमाधनकारक पावसाचा परिणाम डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनावर झालं आहे. अशातच उत्पादन घटल्यानं तुरीच्या डाळींचे दर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिवाळीच्या दिवसांत तूर डाळीला मागणी मोठ्या प्रमाणावर असते, यातच उत्पादनात घट झाल्यानं दरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या 172 रुपये प्रतिकिलो दरानं तूर डाळीची खरेदी करावी लागत आहे. तसेच, जागतिक बाजारपेठेत तूर डाळीला मागणी वाढल्यानं हे भाव वाढल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर तूर डाळीचं भाव वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीच्या तोंडावर हे भाव दोनशे रुपये किलोंवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.