Sugarcan Workers : सध्या राज्यातील उसाचं (Sugarcan) क्षेत्र वाढत आहे. चांगला पाऊस आणि  पाण्याच्या सुविधा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकरी उसाचं उत्पादन घेत आहेत. मात्र हे होत असताना शेतकऱ्यांसमोरील समस्या देखील वाढत आहेत. ऊस तोडणीसाठी करावा लागणारा संघर्ष, उसतोड कामागारांकडून (Sugarcan Workers) होणारी पैशांची मागणी यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. साखर आयुक्तालयाकडून (Sugar Commissionerate) ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.


वर्षभर राबराब राबून ऊस पिकवला जातो. मात्र, हाच ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची खरी कसोटी लागते. ऊस तोडण्यास टोळी मिळत नाही. शेतकरी मेटाकुटीला येतो. उसतोड कामगार हे शेतकऱ्यांकडून देखील उसाची तोडणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. एकरी पाच, दहा, पंधरा हजार रुपयांची देखील मागणी केली जाते. तसेच वाहनाच्या ड्रायव्हरकडून देखील एन्ट्री फी मागितली जाते. याचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतो. अशातच आता उसतोड कामगारांनी बुडवलेली आकडेवारी देखील समोर आली आहे. ऊस तोडणाऱ्या टोळीने वाहतूकदार किंवा कारखानदारांना फसवणे हे आता नवीन राहिलं नाही. मात्र, याबाबतची जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक म्हणावी लागेल. आत्तापर्यंत साधारण 39 कोटी रुपयांना ऊसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवलं आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्त कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं शेती क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहनमालक उसतोड कामगारांना दरवर्षी अॅडव्हान्स देत असतात. मात्र, अनेकवेळा ऊस तोडणीच्या वेळी कामगार येतच नाहीत. याचा मोठा फटका वाहन मालकांना बसतो.


साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलंय?


2004 पासून 2020 पर्यंत राज्यातील 81 साखर कारखांन्याची उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवणूक केली आहे. ही फसवणूक तब्बल 39 कोटी 46 लाख रुपयांची असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी दिली आहे.


राजू शेट्टी काय म्हणाले


दरम्यान, या सर्व प्रकारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावर राजू शेट्टी यांनी काही पर्याय सुचवले आहेत. केवळ साखर कारखानदार यांचेच पैसे बुडाले नाहीत तर खासगी पद्धतीनं कारखान्यांना ऊस पोहोचवणाऱ्या वाहनधारकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फसवले आहे. शेकडो ट्रक चालकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्याचे देखील राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्रातील सगळ्याच उसतोड कामगारांची नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यांची आधार कार्डच्या आधारे ऊस तोड महामंडळाकडे मजूर पुरवावेत त्यामुळं फसवणूक थांबेल. मजूरांचे मुकादमाकडून शोषण होत असल्याचेही शेट्टी म्हणाले. त्यामुळं महामंडळाच्या माध्यमातून तर उसतोड कामगारांना बिनव्याजी कर्ज दिलं तर हा प्रश्न थांबेल. वाहतुकदारांचे, तोडणी मजुरांचे शोषण थांबेल असेही शेट्टी म्हणाले.
 
वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका


एकाच वेळी राज्यातील सुमारे 200 साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळं उसतोड कामगारांची मागणी वाढत असते. वाहनधारक आधीच टोळीच्या मुकादमाला पैसे देऊन करार करुन घेतो. मात्र, अनुभव असा आहे की ऊस तोडीसाठी ना टोळी येते ना त्या वाहन चालकाचे पैसे परत मिळतात. अनेक वेळा पैसे मागण्यासाठी गेलेल्या वाहतूकदाराच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला असल्याची माहिती टोळीने फसवणूक केलेले ट्रकमालक विक्रम पाटील यांनी दिली. 


दरम्यान, उसतोड कामगार हा वर्ग देखील खूप गरीब असतो. मात्र, त्यांच्या नावावर मुकादम पैसे उचलत असतात.. या सगळ्या पैशाचा गोंधळ मुकादम स्तरावर होत असतो. मात्र, याचे खापर उसतोड कामगारावर फोडले जाते. त्यामुळं या संदर्भात अधिकृत नोंदणी करुन ऊसतोड कामगार पुरवले तर ही फसवणूक टाळणे शक्य होईल असा शेतीमधील तज्ज्ञांचा अंदाज आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: