Mumbai Airport Cocaine Seized : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMI Airport Mumbai) महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई पथकाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे पाच कोटी रुपयांच्या 500 ग्रॅमची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला (Cocaine Smuggling) अटक केली आहे. मुंबई विमानतळावर एका 50  वर्षीय परदेशी महिला कोकेनसह प्रवास करत होती. त्या महिलेकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर एका दिवसात कस्टम्स विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींनाही अटक केली आहे. या आरोपींकडून एकूण दोन कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.


कस्टम्स विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी ही कारवाई केली आहे. कस्टम्स एअर इंटेलिजन्स युनिटच्या (AIU) अधिकार्‍यांनी गुरुवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमन हॉलजवळ परदेशी महिला बिंटू जानेह हिला रोखलं. ही महिला इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा ते मुंबई असा प्रवास करत होती. तिच्या बॅगमध्ये कोकेन लपवले होते. हे कोकेन मुंबईतील एका व्यक्तीला द्यायचं होतं. तिच्या हँडबॅगमध्ये 500 ग्रॅम कोकेन सापडल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे.






परदेशी महिला बिंटू जानेह हिला ताब्यात घेऊन सतत चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, तिनं उघड केलं की ती एका गरीब कुटुंबातील आहे. तिला एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील तिच्या व्यक्तीला माल पोहोचवण्यासाठी कमिशन दिलं होतं. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे हे पाकीट तिच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. मात्र, ज्या व्यक्तीकडून पॅकेट्सची डिलिव्हरी घ्यायची होती त्याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचा दावा या परदेशी महिलेनं केला आहे. कस्टम अधिकारी तिच्या साथीदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.


दोन कोटी रुपयांचं 4.5 किलो सोनं जप्त


सीमाशुल्क विभागाने बुधवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच प्रवाशांकडून सुमारे दोन कोटी रुपये किमतीचं 4.5 किलो सोनं जप्त केलं आहे. या प्रवाशांचा सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न सीमाशुल्क विभागानं उधळून लावला. कस्टम अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कालिकत-मुंबई फ्लाइटच्या टॉयलेट आणि सीटमध्ये लपवून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी तीन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हे प्रवासी शारजाहूनआले होते. इतर दोन प्रकरणांमध्ये, दोन प्रवाशांनी त्यांच्या सामानातील कपड्यांमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली. त्यांनी दुबई ते मुंबई असा विमान प्रवास केला. या पाच आरोपींमध्ये काही समान संबंध आहे का, याचा तपास कस्टम अधिकारी करत आहेत.