Mahabeej  : ऐन खरीपाच्या तोंडावर बाजारात 'महाबीज' बियाण्यांचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकर्यांची 'महाबीज' सोयाबीन बियाण्यांसाठी मोठी धावाधाव सुरू आहे. मात्र, बियाणंच उपलब्ध नसल्यानं शेतकर्यांच्या हाती निराशा येत आहे. यावर्षी 'महाबीज'नं फक्त 42 हजार क्विंटल बियाणं बाजारात आणलं आहे. दरवर्षी राज्यभरात असते जवळपास 15 ते 17 लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्याची मागणी असते. यातील 'महाबीज'च्या बियाण्यांचा वाटा हा चाळीस टक्क्यांपर्यंत जास्त असतो. मात्र, आता बियाणंच उपलब्ध नसल्यानं बाजारात 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्याचा मोठा काळाबाजार होण्याची शक्यता अहे. दरम्यान, काल राज्यमंत्री बच्चू कडूंनी 'महाबीज'नं मागच्या वर्षी बोगस सोयाबीन बियाणं देत शेतकर्यांची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. 


'महाबीज' सोयाबीन बियाण्यांची आधी भाववाढ, आता तुटवडा : 


 आधी सोयाबीनची भाववाढ... अन आता 'महाबीज'चं महागलेलं सोयाबीन बियाणंही बाजारात उपलब्ध नाही. 'महाबीज'मूळे शेतकर्यांसाठी 'आधीच उल्हास, त्यात फाल्गून मास' अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामूळे आता 'महाबीज'चं सोयाबीन बियाणं महागल्यानंतर आता शेतकर्यांची फरफट होत आहे ती सोयाबीन बियाणं मिळवण्यासाठी. राज्यभरातील बियाणे बाजारात शेतकर्यांची 'महाबीज' सोयाबीन बियाणं मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्यात यावर्षी जवळपास 47 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहेय. यासाठी जवळपास 17 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता बाजारात असतेय. दरवर्षी सोयाबीन बियाण्यांचा बाजारातील वाटा हा चाळीस टक्के ते निम्म्यापर्यंत असतो. दरवर्षी लाखो क्विंटल सोयाबीन बियाणं बाजारात आणत असलेल्या 'महाबीज'नं यावर्षी फक्त 42 हजार क्विंटल बियाणंच बाजारात आणलं आहे. अन त्यामूळेच या बियाण्यांसाठी मोठी मारामार सुरू झाली आहे. 


 'महाबीज'नं सांगितली तुटवड्याची 'ही' कारणं. 


1) मागच्या वर्षी बियाणं भरण्याच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे 'सीड प्लॉट' वाया गेलेत. त्याचा मोठा फटका बियाणे निर्मितीला बसला. 
2) त्यानंतर बरचसं बियाणं बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या तपासणीत नापास झाल्याने वाया गेलं. 
3) यातून मार्ग काढण्यासाठी उन्हाळी सोयाबीनचा पर्याय 'महाबीज'नं निवडला. परंतू, यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाचा फटका बियाण्याला बसल्यामूळे सीड प्लॉट वाया गेलेत.


गेल्या चार वर्षांत 'महाबीज'नं बाजारात पुरवठा केलेलं सोयाबीन बियाणं.


वर्ष            बियाणे(क्विंटलमध्ये) 
2019 :      5.25 लाख क्विंटल
2020 :      2.35 लाख क्विंटल
2021 :     1.53 लाख क्विंटल
2022 :      42 हजार क्विंटल



शेतकर्यांसह कृषी केंद्र चालकांना होतो आहे बियाणे टंचाईचा मनस्ताप : 


'महाबीज'च्या या बियाणे टंचाईचा मनस्ताप हा शेतकर्यांसोबतच कृषी केंद्र चालकांनाही होतो आहे. कारण, दररोज शेतकरी कृषी केंद्र चालकांकडे 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांसाठी आग्रह धरतात. मात्र, ते उपलब्धच नसल्याने कृषी केंद्र चालकांचीही शेतकर्यांना समजावतांना मोठी धमछाक होते आहे. त्यामूळे शेतकर्यांसोबतच कृषी केंद्रांनाही या टंचाईचा मोठा फटका बसतो आहे. 


राज्यमंत्री बच्चू कडूंचे 'महाबीज'वर गंभीर आरोप : 


'महाबीज'च्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडूंनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. काल अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे आयोजित बियाणे महोत्सवात बोलतांना त्यांनी 'महाबीज'वर गंभीर आरोप केलेत.मागील वर्षी महाबीजला जेंव्हा बियाणं कमी पडलं तेंव्हा अधिकाऱ्यांनी बाजार समितीमध्ये जाऊन बियाणे खरेदी केले आणि महाबीजच्या पाकिटमध्ये भरून विक्री केल्याचा खळबळजनक  गौप्यस्फोट राज्यमंत्री बच्चू कडूंनी केला आहे. ही माहिती 'महाबीज'च्याच अधिकार्यांनीच आपल्याला दिल्याचेही ते म्हणालेत. 



सर्व वादांवर 'महाबीज'चे 'नो कॉमेंट्स' : 


'महाबीज' सोयाबीन बियाण्यांची दरवाढ, त्याचा निर्माण झालेला तुटवडा आणि राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला 'महाबीज' प्रशासनाने नकार दिला आहे. 'महाबीज'चे व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी कार्यालयात नसल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर इतर कुणीही यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, अनौपचारिक चर्चेत असं होणं कदापीही शक्य नसल्याचं महाबीज'चं म्हणनं. सीड सर्टिफिकेशन, सीड ऑडीट आणि इतर कठीण चाळण्यांनंतरच बियाणं बाजारात आणलं जात असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे. 


  'शेतकर्यांच्या विश्वासाचं बियाणं' ही 'महाबीज'ची टॅगलाईन आहेय. दरवर्षी बियाणं उगवण्याबाबतच्या तक्रारी, वाढत असलेल्या किंमती अन बियाण्यांसाठी शेतकर्यांची होणारी धमछाक... या सर्व गोष्टींतून 'महाबीज' शेतकर्यांचा विश्वास खरंच टिकविणार का?, हाच खरा प्रश्न आहे.