Weather Forecast Update Today : सध्या देशाच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला (Cold Weather) आहे. उत्तर भारतातून (North India) कोरडे वारे वाहत असल्यानं थंडी वाढली आहे. दरम्यान, उत्तर भारतातही थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं (Meteorological department वर्तवली आहे.  श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं देशातल काही भागात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.  


दरम्यान, दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाची स्थिती दुसऱ्या दिवशीही अशीच राहणार आहे. त्याचवेळी, कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश तसेच अनेक राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी सुरू झाली आहे. बर्फवृष्टीमुळे डोंगराळ भागात थंडी वाढली आहे. दरम्यान 9 आणि 10 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीतील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येत्या काही दिवसांत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.


हरियाणासह उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, दिल्लीसह हरियाणाच्या फरिदाबाद आणि गुरुग्राममध्ये आज (9 नोव्हेंबर) पाऊस पडण्याची शक्यता आहे. फरिदाबादमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुग्राममध्येही आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


डोंगराळ राज्यात बर्फवृष्टी सुरूच राहणार 


आज डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तराखंडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.


महाराष्ट्रातही गारठा वाढला


राज्यातही थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे थंडी तर दुपारी उन्हाचा चटका राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यात पहाटे दव धुकेही पडत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी दुपारी कडक उन्हाचा चटका बसत आहे. राज्यात किमान तापमान 12 ते 21 अंशाच्या आसपास आहे.