Rythu Bandhu Scheme :  तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून रायथू बंधू ही योजना चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपयांसह विविध योजना दिल्या जातात. या योजनेचाच एक भाग म्हणून संक्रातीच्या आधी सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा केलेल्या रक्कमेचा 50 हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. राज्यातील 66 लाख शेतकऱ्यांपैकी 64 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ झाला आहे. तर उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांनाही ही रक्कम लवकरच मिळणार आहे.  


तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ही योजना सुरू केली होती. 2018 पासून शेतकऱ्यांना या योजनेद्वारे आठ वेळा हे पैसे मिळाले आहेत. तेलंगणा सरकारने सुमारे 43, 036.64 कोटी रुपये या योजनेवर खर्च केले  आहेत. तर नुकताच देण्यात आलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. 


काय आहे रायथू बंधू योजना? 
तेलंगणा सरकारडून राबवण्यात येणाऱ्या रायथू बंधू योजनेतून शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जातो. शिवाय प्रति एक एकर शेतीसाठी वर्षाला दोन टप्यात दहा हजार रूपये मदत स्वरूपात हंगाम सुरू होण्याआधी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. या योजनेमुळे तेलंगणात कृषी क्षेत्राची चांगली प्रगती झाली आहे. 2014 मध्ये 1.8 टक्के असलेले कृषी आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या क्षेत्र आता 8 टक्क्यांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाची महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या कठीण काळातही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवली  आहे. तेलंगणा सरकारच्या रायथू बंधू योजनेच्याच धरतीवर केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. शिवाय तेलंगणात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांनीही ही योजना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. 


शेतकऱ्यांकडून आनंदोत्सव 
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेतील आठवा हप्ता जमा केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आणि टीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात आनंदोत्सव साजरा केला आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेला ‘अभिषेक’ केला. तर काहींनी राज्यभर बैलगाडी आणि ट्रॅक्टर रॅली काढल्या. याबरोबरच महिला शेतकऱ्यांनी बथुकम्मा आणि कोलाटम सारखे खेळ खेळले.  तर पुरुषांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रॅली काढली. शेतकऱ्यांच्या या आनंदोत्सवात राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदारसुद्धा सहभागी झाले होते. यात शिक्षण मंत्री पी. सबिता, इंद्रा रेड्डी यांनी त्यांच्या महेश्वरम मतदारसंघात स्वतः ट्रॅक्टर चालवला. तर कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सत्थुपल्ली मतदारसंघातील नारायणपुरम येथे ट्रॅक्टर चालविला. याबरोबरच राज्याचे पर्यटन मंत्री व्ही. श्रीनिवास राव यांनी महबूबनगरजवळील गावात ट्रॅक्टर चालविला.  


महत्वाच्या बातम्या