Bamboo Plantation : देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांनी बांबूचे पीक सहकार क्षेत्रात घ्यावं, असं वक्तव्य भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं आहे. त्यासंदर्भात निर्णय झाला, तर बांबू उत्पादक शेतकऱ्यांचा सहकारी तत्वावर समूह तयार होऊन, देशात इथेनॉल उत्पादनात क्रांती होईल असेही पाशा पटेल म्हणाले. बांबू पीक हे शेतकऱ्यांसाठी जास्त खर्चिक नाही. त्यामुळं याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असेही पाशा पटेल म्हणाले.


दरम्यान, 2030 पर्यंत 10 टक्के वाहनं फ्लेक्स इंजिनवर ( एकापेक्षा जास्त इंधनाचा वापर करणारे इंजिन ) चालतील. त्यामुळं त्यासाठी इथेनॉल मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. उसाची मर्यादित उपलब्धता पाहता तेवढे इथेनॉल उसापासून तयार करणं शक्य होणार नाही. त्यामुळं आता बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचं तंत्र विकसीत झालं आहे. जर बांबूला सहकारात घेतले तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उत्पादित होणारा बांबू मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करु शकेल असेही पाशा पटेल यावेळी म्हणाले.  दरम्यान,1 टन उसासाठी 2 कोटी लिटर पाणी लागतं.  तर त्यापासून 80 लिटर इथेनॉल तयार होतं. त्याउलट 1 टन बांबूसाठी 20 लाख लिटर पाणी लागतं आणि 400 लिटर इथेनॉल तयार होतं, असे पटेल म्हणाले.


त्यामुळं जर उसाऐवजी बांबूची शेती केली तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. सोबतच इथेनॉलचा उत्पादनही अनेक पटींनी जास्त होतो. त्यामुळं आम्ही उसाऐवजी बांबूची शिफारस करत असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले. दरम्यान, बांबूपासून 30,000 लिटरची निर्मिती करणारी जगातील पहिली इथेनॉल रिफायनरी भारतात उभारणार असल्याचेही पाशा पटले यांनी सांगितले. 


दरम्यान, बांबू पिकाला पाणी आणि खते यांचे प्रमाण फारच कमी लागते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने पिकासाठी कीटकनाशकांचा वापर सुद्धा कमी होतो. आशिया खंडात गेल्या वीस वर्षापासून बांबूचे उत्पादन लक्षणीय वाढले आहे. जर महाराष्ट्राचा विचार केला तर मानवेल, कटांग काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू या प्रजातीचे बांबू आढळतात. बांबूची लागवड केल्यापासून साधारणतः पाच वर्षांचा त्याचे उत्पन्न मिळायला लागते. त्यानंतर साडेचार लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्रतिमहिना मिळू शकते. हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, कागद उद्योगासाठी बांबूचा उपयोग होतो.