Swabhimani Shetkari Sanghatana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आता फोडाफोडीच्या बाहेर येऊन शेतकर्यांकडे पाहावं. राज्यातील शेतकर्यांची अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अन्यथा दुरंगी सरकारचा बेरंग करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल (Ranjit Bagal) यांनी दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री दररोज आमदार आणि खासदार फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत असताना देखील मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना फोडाफोडी सुचते, ही दुर्दैवी आणि चीड आणणारी बाब असल्याच त्यांनी म्हटलं आहे.
सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुख्यमंत्री पाचवेळा दिल्लीला जावुन आले, परंतू त्यांना शेतकर्यांच्या बांधावर जायला वेळ मिळाला नाही. ही एक प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे बागल यांनी म्हटलं आहे. हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्यात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील आठ ते नऊ लाख हेक्टरवरील शेती पिकांचे या अतिवृष्टीमुळं नुकसान झालं आहे. तसेच जवळपास चार हजार हेक्टरवरील शेती ही तीव्र अतिवृष्टीग्रस्त होवून वाहून आणि खरडून गेली आहे. राज्यातील शेतकरी या अतिवृष्टीनं पुर्णपणे हवालदिल झाला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या नुकसानीचे कसलेही देणेघेणे उरलं नसल्याचा आरोप बागल यांनी केला.
शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा असताना दोन मंत्र्यांचे सरकार
शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा असताना अवघ्या दोन मंत्र्यांचे मंत्रीमंडळ आहे. फक्त सरकार म्हणून नावालाच दिसत आहे. राज्य संकटात असताना या दोघांकडून इथल्या शेतकर्यांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या नुकसानीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. ही खरोखरच चीड आणणारी बाब आहे. राज्याच्या दोन्ही नेत्यांना जर शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नसतील तर त्यांची ही सत्तेची नशा स्वाभिमानी शेतकरी संघटना नक्कीच उतरवेल असा इशारा बागल यांनी दिला.
अटीशर्थी न लावता शेतकऱ्यांना मदत करा
राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान मोठे आहे. सरकारने यावर तातडीने मदत करावी. पाहणी, पंचनामे, नियमावली यांसारख्या अटीशर्थी न लावता शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. दोनच मंत्री असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या या संकटाचा गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास या सरकारला राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचा हिसका नक्कीच दाखवेल असेही बागल म्हणाले. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यास सरकारला भाग पाडू. सरकारने तातडीने मदत न केल्यास येत्या काळात संपूर्ण राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन या दुरंगी सरकारचा बेरंग नक्कीच करेल असा इशाराही बागल यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या: