धुळे : धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी परिसरात यंदा रब्बी हंगामात सूर्यफूलाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून पाण्याअभावी रब्बीच्या हंगामावर परिणाम होत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडत असून रब्बीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तीन-चार वर्षांनंतर यावर्षी सूर्यफूलाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात सूर्यफूल पिके बहरली आहेत.


रब्बी हंगामातील वातावरण सूर्यफूल पिकासाठी अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. हे पीक कमी कालावधीत येणारे असून सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येणारे पीक आहे. हे पीक पावसाचा ताण बर्‍याच प्रमाणात सहन करु शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. दुसरे असे की, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. 


शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामात हेच मुख्य पीक घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यात खरीप तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड शेतकरी करत असतात. परंतु, ग्रामीण भागातील फारच कमी शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग आणि त्यापासून मिळणारा नफा पाहाता आता सध्या येथील शेतकरी जरा सजग होऊ लागला आहे.


सूर्यफुलाची शेती कशी करतात?
सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी लागते. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्या लागतात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे लागते. महाराष्ट्रातील बियांमध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सूर्यफूल या पिकाचा जवळजवळ 70 टक्के क्षेत्र व्यापले आहे. खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य आणि उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलाला प्राधान्य दिले जाते. वर्षभरात तीनही हंगामांमध्ये घेतले जाणारे सूर्यफूल पिकाची खरिपात 15 जून ते 15 जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशीर झाल्यास किंवा खरीप पिकाची दुबार पेरणी झाल्यास सूर्यफूल पीक घेण्याचा विचार केल्यास ती वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो. दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात होणारी घट ही एक चिंतेची बाब झाली आहे. धुळे जिल्ह्यातील ठराविक भागातच सूर्यफुलाची शेती केली जाते. अत्यंत कमी खर्चात होणारी ही शेती असली तरी उत्पादन मात्र भरघोस मिळवून देणारी आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या भावात मोठ्याप्रमाणावर दरवाढ झाल्याने यंदा सूर्यफुलाच्या तेलाला मागणी वाढण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.