Sugarcane News : सध्या राज्यात ऊसाचा गळीत हंगाम (Sugarcane season) सुरु आहे. कारखान्यांकडून राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी सुरु आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी ऊसाचे पाचट पेटवून देतात. मात्र, हे पाचट पेटवून न देण्याचं आवाहन पुणे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या (Pune Agriculture Department) वतीनं करण्यात आलं आहे. याला शेतकरी देखील प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसत आहे. ऊसाचे पाचट न पेटवता त्याची मशीनद्वारे कुटी करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. मात्र, ऊसाचं पाचट न पेटवल्याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो. पाचटाची कुटी करण्याची गरज काय? याबाबतची माहिती पाहुयात...
याबाबत शिरूर तालुक्याचे कृषी अधिकारी सिध्देश ढवळे यांच्याशी संपर्क केला. यावेळी त्यांनीही सविस्तर माहिती दिली. शिरुर तालुक्यात सरासरी 30 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. आम्ही शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापनाचे महत्व पटवून देत असल्याचे ढवळे म्हणाले. ऊस तोडणी नंतर शिल्लक राहणारे पाचट कुजवल्याने जमिनीचा पोत सुधारून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीचे आरोग्य ही महत्वाची बाब बनलेली आहे. त्याकरिता कृषि विभागामार्फत मागील वर्षांप्रमाणे याहीवर्षी ऊस पाचट व्यवस्थापन मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे ढवळे म्हणाले. मागील वर्षी तालुक्यात जवळपास 4 हजार एकर क्षेत्रावर पाचट कुजवण्यात आले आहे. त्यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊन उत्पन्न वाढले आहे. प्रोत्साहनपर पाचट कुटी यंत्रसाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुदान देखील देण्यात येत असल्याचे ढवळे म्हणाले.
पाचट न जाळण्याचे फायदे काय?
पाचट व्यवस्थापनाबाबत एबीपी माझानं शिरुर तालुक्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी पाचट व्यवस्थापनाचे फायदे सांगितले. पाचट पेटवल्याचे अनेक तोटे आहेत. पाचट पेटवल्यामुळं वातावरणातील तापमान वाढते. जमिनीचे तापमान वाढल्यामुळं जिवाणू नष्ठ होत असल्याची माहिती कृषी सहायक जयवंत भगत यांनी दिली. यालट पाचट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. पाचट ठेवल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते. तसेच जमिनीचा 1 ते 1.5 टन सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. त्यामुळं जिवाणूंची संख्या वाढल्यानं खोडवा ऊसाच्या उत्पादनात वाढ होत असल्याची माहिती जयवंत भगत यांनी दिली. जमिनीत जिवाणूंची संख्या वाढल्यामुळं भविष्यात ज्या जमिनी नापिक होणार आहेत, तो धोका वाचतो. पाचट ठेवल्यामुळं रासायनिक खतांची उपलब्धता होते. नत्र, स्फुरत, सेंद्रीय कर्ब, पालाश याचा मोबदला मिळतो. रासायनिक खतांच्या खर्चात बचत होत असल्याचे भगत म्हणाले.
पाचट कुटी मशीनसाठी शेतकऱ्यांना अनुदान
आम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचट ठेवण्याचं आवाहन केल्याची माहिती जयवंत भगत यांनी दिली. 100 टक्के गावांनी पाचट न पेटवता कुटी करावी असा कृषी विभागाचा उद्देश आहे. यासाठी आम्ही कुटी मशिनसाठी अनुदान देत असल्याचे भगत म्हणाले. पाचट कुटीचे मशीन उपलब्ध झाल्यामुळं शेतकऱ्यांना पाचट कुटू करणे सहज शक्य झालं आहे.
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. सध्या याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जयवंत भगत यांनी दिली. पहिल्या वर्षी उभे राहुन काम करावे लागले. सुरुवातीला मशीनची कमतरता होती. लोकांमध्ये विश्वास निर्माण करताना थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतू मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना पाचट व्यवस्थापन केलं त्यांच्या खोडव्याचे उत्पादन वाढल्याचे भगत यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लोकाचा पाचट कुटी करण्याकडे खूप कल वाढल्याचे ते म्हणाले. आता सुपीकतेचं महत्व शेतकऱ्यांना पटलं आहे. पुढच्या काळात शेतकऱ्यांना याबाबत आणखी जागृत करण्याचे उद्दीष्ट आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रात्यक्षिके देत असल्याचे भगत म्हणाले.
शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
पाचट व्यवस्थापनासंदर्भात एबीपी माझाने काही पुणे जिल्ह्यातील काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसी देखील संवाद साधला. यावेळी शिरूर तालुक्यातील गुनाट येथील शेतकरी विजय वाबळे म्हणाले की, मी दरवर्षी सहा एकर क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन करतो. पाचट व्यवस्थापन केल्यामुळं लागणीच्या ऊसाला 95 तर खोडव्याचे ऊसाचे 83 टन एकरी उत्पादन मिळाले आहे. पाचट कुटी केल्यानंतर सेंद्रिय कर्बात वाढ होऊन जमिनीची सुपिकता वाढत आहे. त्यामुळं जीवाणुंच्या संख्येत वाढ होते. परिणामी ऊसाच्या उत्पादनात वाढ झाल्याची माहिती ऊस उत्पादक शेतकरी योगेश दत्तात्रय गाडे यांनी दिली. मी दरवर्षी पाचट कुटी करत असल्याचे गाडे म्हणाले. कृषी विभागाच्या पाचट जाळू नका या अभियानाला प्रतिसाद दिल्याने खोडवा ऊसाचे 83 टनापर्यंत उत्पादन शक्य झाले. पाचट व्यवस्थापन गरजेचे असल्याचे प्रतिपादन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त तज्ञ संचालक विजय वाबळे यांनी केले
महत्त्वाच्या बातम्या: