Watermelon Farming : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील तरुण शेतकऱ्याने कलिंगडाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. सागर पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सागर यांनी आपल्या पाच एकर शेतात अवघ्या 75 दिवसात घेतलेल्या कलिंगडाच्या उत्पादनातून तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांची कमाई केली आहे. पिकाचे केलेले योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यामुळे सागरने यावर्षी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील सागर प्रवीण पवार यांचे बीएससी ऍग्री पर्यंतचे शिक्षण झाले आहे. शेतात विविध प्रयोग करण्याची त्यांना मनापासून आवड असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये विविध प्रयोग नेहमी करत असतो. वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पाण्याची चांगली उपलब्धता आहे. याच शेतात कापूस भाजीपाला कांदा अशी विविध पिके घेतली जात होती. मात्र नफा आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने विविध पर्यायी पिकांचा सागरने विचार केला.
सागरने आपल्या शेतात कलिंगडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सागरने पाच एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरुन ठिबक सिंचन केले. त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे 55 हजार रोपांची लागवड केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खतांची मात्रा देण्यात आली. याचाच परिणाम म्हणून केवळ पंच्याहत्तर दिवसातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून यातून सागरला तब्बल 13 लाख 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र हे कलिंगड स्थानिक बाजारपेठेत विकण्याऐवजी दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी त्याने संपर्क साधून विविध देशातील बाजारपेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठवले. पिकाचे केलेले योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यामुळे सागरने यावर्षी कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
असे घेतले उत्पादन
सागरने सात ते नऊ जानेवारी दरम्यान कलिंगडाची रोपे लावली. सात फूट अंतरावर यांत्रिक पद्धतीने ही लागवड करण्यात आली. पिकांच्या उष्णतेसाठी तीन ते चार टन कोंबडी खत वापरण्यात आले. त्यासोबतच मायक्रोन मल्चिंग पेपरचा वापर करत प्रति एकरी सुमारे आठ हजार रोपांची लागवड केली. हा पेपर वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली. वेलवर्गीय पिकांवर व्हायरस तुडतुडे मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो हा रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला. सागरने पिकवलेल्या कलिंगडाला दिल्ली मुंबईसह गुजरातमधील व्यापाऱ्यांचा ही उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवनवीन प्रयोग केल्यास यश नक्की मिळते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.