Bhandara News : घरची परिस्थिती सधन, बसलेल्या जागेवर एका आवाजात पाहिजे असलेली वस्तू देण्यासाठी धावणारी घरगड्यांची फौज. मात्र हे सर्व असताना, भंडाऱ्याच्या साकोली येथील सरिता फुंडे या स्वतः शेतात राबतात. दोन-चार एकर नाही तर, तब्बल 21 एकर शेतात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनातं कायापालट करीत पारंपरिक पिकांना फाटा देत, शेतात बागायतीचा आधुनिक प्रयोग केलाय. यातून त्यांनी आर्थिक प्रगती तर साधलीचं मात्र, समाजातील इतर महिलावर्गांनाही शेतीकडं वळण्याचा सल्ला दिलाय.
स्वतः शेतात राबून शेतीतून साधली किमया
सरिता फुंडे या आहेत भंडाऱ्याचे (Bhandara) राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सहकार महर्षी सुनील फुंडे यांच्या सौभाग्यवती. विवाहानंतर सर्व सुख समृध्दी आणि वातानुकूलीन जीवन मिळालं असलं तरी सरीता या शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानं त्यांची सर्वसामान्यांशी नेहमी नाळ जुळलेली आहे. बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतलाय.
अशा स्वभावाच्या सरिता फुंडे या शेतातील कुठलंही काम असो, शेतात भातपिकांची लागवड असो की, बागायती शेतातील लागवड. स्वतः साडीचा पदर कंबरेला खोचून त्या शाश्वत शेती करतात. ही शेती करताना कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता त्या नैसर्गिक शेती करतात. यासाठी त्या शेतातचं गांडूळ खत, दशपर्णी अर्क तयार करतात आणि त्याचा वापर बागायती पिकांच्या संरक्षणासाठी करतात. मागील 8 वर्षांपासून त्या शेतीत गुंतल्या असून वर्षाला लाखो रुपयांचं आर्थिक उत्पादन घेतात. इतर महिलांनी शेतीकडं वळून प्रगती साधावी, असं त्यांनी आवाहन केलं आहे.
मासोळी, भातपीक, मका, भाजीपाला, दुग्ध व्यवसायातून केली व्यावसायिक क्रांती
शेतात फिशटॅंकमधून निघणाऱ्या मासोळ्या असो की, काश्मिरी बोर, आंबा, चिकू, टरबूज, टोमॅटो, फणस, चवळी, ढेमसं, कारली, केळी, लिंबू, मका, भातपीक या बागायतीचं उत्पादन घेतात. त्यांच्याकडं फिशटॅंकमध्ये पांढरा, निळसर, गुलाबी, फिक्कट गुलाबी, गर्द लाल प्रकारच्या कमळाचे उत्पादन घेतात. यासोबत दुग्ध व्यवसायातून त्यांनी धवल क्रांती केली आहे. त्यांच्या या प्रेरणादाई प्रवासातून अनेक जण प्रेरित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या